मुंबई Lok Sabha Election 2024 : राज्यात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील सर्व 6 जागांचा समावेश असून याकरता आता मुंबईत प्रचारानं जोर धरलाय. पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा तर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये पंतप्रधान मोदी यांचा रोड शो होत आहे. यादरम्यानच आता 'दीवार' या चित्रपटातील डायलॉगच्या आडून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना इशारा देत असल्याचं बघायला मिळतंय.
चित्रपटातील डायलॉग्सचा प्रचारात वापर : 2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी निशाणा साधला होता. आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग.. पिसिंग अँड चक्की पिसिंग, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एका प्रचारसभेत 'बाजार समितीत कोणी भ्रष्टाचार केला असेल तर चक्की पिसिंग अँड पिसिंग' असा इशारा निलेश लंके यांना दिला होता. तसंच बारामतीत मतदानाच्या दिवशी 'मेरे पास मेरी माँ है' असं विधान अजित पवारांनी केलं होतं. तर ठाणे येथील सभेतून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी महायुतीच्या उमेदवाराविरोधात टीका करताना 'मेरा बाप गद्दार है' असं तुमच्या कपाळवार लिहिलंय असं म्हणाल्या होत्या.
तू किस झाड की पत्ती : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यात लढत होत आहे. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहमदनगरमध्ये सभा पार पडली. सभेदरम्यान अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. "महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा बंदोबस्त बरोबर केला असून तू किस झाड की पत्ती है. सगळ्या ठिकाणी तुला अजित पवार दिसेल", असं म्हणत त्यांनी निलेश लंके यांना इशारा दिला.
तुम क्या जानो एक ईडी की नोटीस की कीमत : ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान 'ओम शांती ओम' या चित्रपटातील डायलॉगचा आधार घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 'तुम क्या जानो एक चुटकी सिंदूर की कीमत रमेश बाबू', त्याप्रमाणे 'तुम क्या जानो एक ईडी की नोटीस की कीमत रमेश बाबू' असं म्हणत त्यांनी टीका केली होती.
नेत्यांच्या भाषेचा तोल सुटत चाललाय : राजकीय नेत्यांच्या अशा वक्तव्यांसदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय तानपाठक म्हणाले की, "सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सगळ्याच नेत्यांच्या भाषेचा तोल सुटत चाललाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बोलण्याची स्टाईल अशाच प्रकारची आहे. मात्र, अनेक नेते जनतेचं लक्ष आपल्याकडं वेधण्यासाठी अशा भाषेचा वापर करतात. त्यामुळं आता सर्वकाही मतदारांच्याच हातात आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणुकीचा प्रचार विकासावरून जाती-धर्मावर घसरला - Lok Sabha Election 2024
- श्रीकांत शिंदेंच्या प्रचारात फटाक्यामुळं भाजली आज्जी; दोनशे रुपये बेतले जीवावर - Lok Sabha Election 2024
- ठाकरे गटाच्या शाखेत चक्क शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; ठाकरेंचे कार्यकर्ते गैरहजर तरीही.... - Lok Sabha election 2024