कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी नाराज आहेत, अशी चर्चा सुरू आहे. राहुल गांधींचं सोशल इंजिनिअरिंग झालं पाहिजे आणि सर्वांना संधी मिळाली पाहिजे, अशी भाजपाची भावना आहे आणि ती चुकीची आहे, असं म्हणता येणार नाही, असं स्पष्टीकरण देत भाजपा आणि महायुतीचा गनिमी कावा त्यांच्यावरच उलटेल. लोकसभेला याची झलक दिसली आहे. आता विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनताच भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करेल, अशी टीका, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली.
गनिमी काव्याने भाजपाचा कार्यक्रम होणार : "सोयाबीनला मिळालेला भाव, महागाई, बदलापूरमध्ये झालेला अत्याचार, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हेही राज्यातील जनता अजून विसरलेली नाही. यामुळं महाराष्ट्राची जनता आता गनिमी काव्याने भाजपाचा कार्यक्रम नक्की करणार," असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
राजेश लाटकर यांना दिली उमेदवारी : "महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र जाऊन 29 तारखेला शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. राजेश लाटकर या एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त होती. मात्र, जयश्री जाधव विद्यमान आमदार यांनी देखील आपलं मोठं मन दाखवत, आपण जो निर्णय घ्याल तो मान्य असेल, असं सांगितलं. यामुळं एक तरुण कार्यकर्ता म्हणून आणि लाटकर यांची निवड केली. कोल्हापूरच्या जनतेतला, मोटर सायकलवरून जाणारा आमदार निवडून यावा अशी लोकांची अपेक्षा आहे. लोक त्याला प्रतिसाद देतील. तसंच जिल्ह्यातील शिरोळ, राधानगरी, इचलकरंजीमधील बंडखोरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे," असं आमदार सतेज पाटील यावेळी म्हणाले.
कोल्हापुरात काँग्रेस कार्यालयावर अज्ञातांची दगडफेक : शनिवारी रात्री महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा झाली. यानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसर शेजारी असणाऱ्या काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळं महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून जिल्ह्यातील बंडखोरांना थंड करण्याचं आवाहन आता महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आहे.
जिल्ह्यातील उमेदवार निश्चित झालेले मतदारसंघ :
महाविकास आघाडी - करवीर- राहुल पाटील, कोल्हापूर उत्तर- राजेश लाटकर, कोल्हापूर दक्षिण -ऋतुराज पाटील, कागल- समरजितसिंह घाटगे, राधानगरी -भुदरगड- के पी पाटील, चंदगड- नंदाताई बाभुळकर, शिरोळ- गणपतराव पाटील, पन्हाळा -शाहूवाडी- सत्यजित पाटील (सरूडकर), हातकणंगले- राजू बाबा आवळे, इचलकरंजी- मदन कारंडे.
महायुती - कागल-हसन मुश्रीफ, चंदगड- राजेश पाटील, कोल्हापूर दक्षिण- अमोल महाडिक, कोल्हापूर उत्तर- राजेश क्षीरसागर, इचलकरंजी राहुल आवाडे, शिरोळ- राजेंद्र पाटील यड्रावकर, हातकणंगले- अशोकराव माने, राधानगरी-भुदरगड- प्रकाश आबीटकर, पन्हाळा -शाहूवाडी- विनय कोरे, करवीर- चंद्रदीप नरके.
हेही वाचा -