ठाणे : मीरा भाईंदर परिसरात आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा आमदार गीता जैन यांचे भाऊ सुनील जैन यांच्यावर तर दुसरा गुन्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यात 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरात भरारी पथकं स्थापन करण्यात आली आहेत.
रिक्षाचालकांना दिल्या भेटवस्तू : आमदार गीता जैन यांचे बंधू सुनील जैन यांच्या रुद्र फाऊंडेशनच्या वतीनं 19 ऑक्टोबर रोजी भाईंदर पश्चिम येथील अग्रवाल मैदानावर रिक्षाचालकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रिक्षाचालकांना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. यासंदर्भात सोशल मीडियावर काही फोटो, व्हिडिओही व्हायरल झाले होते. दुपारी 3 वाजता मेळावा संपला आणि भरारी पथक संध्याकाळी 7 वाजता पोहोचलं. पथकानं घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी आचारसंहिता भंग झाल्याचा कोणताही प्रकार दिसून आला नव्हता. मात्र, या मेळाव्याचा फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये या मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक भेटवस्तू घेऊन जात असल्याचं आढळून आलं.
आचारसंहिता भंग झाल्याचं निष्पन्न : रिक्षाचालकांना दिलेल्या भेटवस्तूंवर "फिर एक बार गीता आमदार" असं पोस्टर देखील आढळून आलं. एका स्थानिक नागरिकानं मेळाव्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. त्यानंतर भरारी पथकानं सगळ्या गोष्टी तपासल्या असता आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार भरारी पथकातील तक्रारदार राजेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आमदार गीता जैन यांचे भाऊ सुनील जैन यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
भाजपा जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल : दुसरीकडे, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी 17 ऑक्टोबर रोजी मिरारोड पूर्वच्या सेंटर पार्क मैदानात 'लाडकी बहीण योजने'संदर्भात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सदर कार्यक्रम विनापरवाना आयोजित करण्यात आल्याचं आढळून आलं. या कार्यक्रमाचे फोटो वकील कृष्णा गुप्ता यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली होती. त्यानुसार भरारी पथकातील विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मिरारोड पोलीस ठाण्यात भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा
- 'राज'पुत्रा समोर दुहेरी आव्हान, माहीम विधानसभेत अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदे आणि ठाकरेंचे उमेदवार रिंगणात
- भाजपाला मोठा झटका; 'या’ बड्या नेत्याने केला युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश, दर्यापूरमधून लढणार निवडणूक
- महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांचं 85-85-85 जागांवर एकमत, उर्वरीत जागा घटकपक्षांसाठी, एकूण 270 जागांवर सहमती