मुंबई CM Eknath Shinde Exclusive Interview : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झाले असून आता सर्वांचं लक्ष 4 जूनच्या निकालाकडं लागलंय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना बघायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर भाजपानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या प्रचारार्थी महाराष्ट्रात रस्त्यावर उतरवले. तर महाविकास आघाडीकडूनदेखील राहुल गांधी, अरविंद केजरीवालांपासून शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र पिंजून काढला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी विशेष बातचीत केली असता मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्नांची बेधडक उत्तरं दिली.
घरात बसून फेसबुक लाईव्ह करायचे : महाराष्ट्रातील निवडणुकीचे पाचही टप्पे संपल्यानंतर ज्या पद्धतीचा प्रचार आणि प्रचारादरम्यान ज्याप्रकारे आरोप-प्रत्यारोप झाले त्यानं एकंदरीत जे चित्र निर्माण झालं. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्हाला पूर्ण विश्वास आहे. 4 जूनला आम्हाला अपेक्षित असा निकाल या महाराष्ट्रात लागेल. कारण मागील दोन वर्षांत केलेलं काम पाहून जनतेनं आम्हालाच कौल दिला असणार! महायुतीचं सरकार स्थापन करायच्या अगोदर मागचं सरकार पूर्णपणे ठप्प होतं. ते केवळ घरात बसून फेसबुक लाईव्ह करायचे. तेव्हा सर्व प्रकल्प बंद पडले होते. आम्ही मेट्रोचे प्रकल्प सुरू केले. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुरू केला. अटल सेतू सुरू केला. मेट्रो टू, मेट्रो सेवेन, मेट्रोची काम सुरू केली. आम्हीच मुंबई कोस्टल रोडचं कामदेखील सुरू केलं. दुसरी बाजूदेखील लवकर सुरू होईल. मुंबई, पुणे, नाशिक सर्व ठिकाणी जे प्रकल्प बंद होते, त्याला मी चालना दिली. आपण कुठंही बघितलं तर मुंबईमध्ये सर्व प्रकल्प प्रगतीपथावर आहेत." तसंच अगोदरच्या सरकारमध्ये पूर्णपणे निगेटिव्हिटी होती, असा टोलाही शिंदेंनी लगावला.
40 प्लस आमच्या जागा येतील : न्यायालयानं खरी शिवसेना म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं निकाल दिला असला तरी जनतेचा कौल 4 जूनला येणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं असली आणि नकली शिवसेना कोणती याचा फैसला होईल. या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, "आम्ही महिलांसाठी आणि तरुणांसाठी नोकऱ्या दिल्या. मोठ्या प्रमाणात विकास केला. प्रत्येक गोष्टीला चालना दिली. वयोवृद्धांसाठी वयोश्री योजना लागू केली. आरोग्य, शिक्षण, शेती त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा मजबूत केल्या. त्यामुळं आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की या निवडणुकीत राज्यात 40हून अधिक आमच्या जागा येतील."
शरद पवारांनाही सोडण्याचा डाव : "खरी शिवसेना तुमची म्हणता, पण उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जागा वाटपात तुम्ही कमी पडलात? या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आमचे 13 खासदार असून आम्ही 15 जागा लढवल्यात. जागा किती लढवतो यापेक्षा पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं आमचं लक्ष्य आहे. त्यामुळं कोणी किती जागा लढवल्या? यापेक्षा या राज्यातून त्यांना अधिक जागा किती मिळाव्या, त्यातून पंतप्रधान मोदींचे हात बळकट कसे होतील त्यावर आम्ही मेहनत घेतली. तसंच जागा वाटप होण्यास कुठंही उशीर झाला नाही. आम्ही योग्य पद्धतीनं जागावाटप केलं."
पवार साहेबांनासुद्धा धोका दिला असता- पुढं ते म्हणाले की, "विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते विकासाबद्दल बोलू शकत नाहीत. त्यामुळे ते वारंवार गद्दार-गद्दार बोलतात. प्रचाराची खालची पातळी त्यांनी गाठली. गद्दारीचं म्हणाल तर 2019 मध्ये याच उबाठाने आपल्या मित्र पक्षासोबत गद्दारी केली. महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना-भाजपा युती म्हणून आम्ही लढलो. पूर्वी यांना काँग्रेस नको होती. बाळासाहेब असते तर यांना जोड्यांनी बडवलं असतं. गद्दारी यांनी एकदा नाही तर दोनदा केली. मोदींना हे भेटून आले. त्यावेळेसदेखील ज्या शरद पवारांनी यांना मुख्यमंत्री केलं त्यांनाही सोडण्याचा त्यांचा डाव होता. पण पाच वर्ष त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजं होतं. म्हणून ते बसून राहिले. अन्यथा त्यांनी पवार साहेबांनासुद्धा धोका दिला असता", असा गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केला.
...त्यांनी बाळासाहेबांचा विश्वासघात केला : मुख्यमंत्री पुढं म्हणाले की, "ही अनैसर्गिक युती आहे. ते खुर्चीसाठी इतके अंध आणि अस्वस्थ झाले होते की, त्यांना सत्तेच्या मोहापाई त्यांना काही दिसत नव्हतं. बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले. बाळासाहेब यांचा सुद्धा त्यांनी विश्वासघात केला. आमच्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. या निवडणुकीत कुठलाही भावनिक मुद्दा नव्हता. मोदींचे मन मोठं असून यांच्यासारख्या छोट्या मनाचे ते नाहीत. मोदीजी फक्त बाळासाहेबांमुळं यांना मदत करताय. राज्यसभा, विधान परिषद निवडणूक होती तेव्हा सतत त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. हे सर्व सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक आहे. पण राज्यातील जनता सर्व जाणते. मी बंड केलं तेव्हा माझ्यावर आमदारांचा पूर्ण विश्वास होता. 50 आमदार सत्तेला ठोकर मारून जनतेसाठी माझ्यासोबत आले. देशाच्या इतिहासात कधी जे घडलं नव्हतं, ते महाराष्ट्रात घडलं. इतका मोठा निर्णय का घेतला? त्याचं कारणही महत्त्वाचं आहे. कारण तो टोकाचा निर्णय होता. आम्ही जे केलं ते छातीठोकपणे आणि उघडपणे केलं. आम्ही लपून-छपून काहीच केलेलं नाही", असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
या सर्वांना रस्त्यावर आणण्यासाठी मोदी रस्त्यावर आले : पहिल्यांदा मुंबईत प्रचारासाठी मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं? यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "असा काही नियम आहे का? की रस्त्यावर उतरून प्रचार करू नये. मोदी हे सर्वांना रस्त्यावर आणण्यासाठी रस्त्यावर आले होते. लोकांना मोदींकडून अपेक्षा आहे. लोक त्यांना बघण्यासाठी येतात. घाटकोपरमध्ये झालेली घटना दुर्दैवी आहे. जे दोषी आहेत, त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल, तशा सूचना दिलेल्या आहेत. गजानन कीर्तिकर आणि आनंदराव अडसूळ यांची नाराजी हा पक्षातील आमचा अंतर्गत परिवाराचा विषय आहे. तो परिवारातच मिटेल", असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -
- EXCLUSIVE : या निवडणुकीत जनतेचा मूड काय? पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' उत्तर - PM Modi Interview with Eenadu
- "2016 मध्येच भाजपाबरोबर जाणार होतो, पण..."; 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट - Sunil Tatkare Exclusive
- महायुतीत भाजपाकडून शिवसेनेची कोंडी? आमदार मनीषा कायंदेंनी स्पष्टच सांगत विषय संपवला - MANISHA KAYANDE EXCLUSIVE INTERVIEW