मुंबई : १६ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. त्यापूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ३९ विधिमंडळ सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर झालेल्या पहिल्या जम्बो मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. याप्रसंगी त्यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला. तसेच हे सरकार संविधानानुसार घेतलेल्या शपथेप्रमाणे काम करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
येत्या दोन दिवसात खातेवाटप : याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी सुद्धा आहे. म्हणून या अधिवेशनात महाराष्ट्राच्या जनतेला ऊब भेटेल असा प्रयत्न आम्ही करू. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज केलेला आहे आणि या ठिकाणी ३९ मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. ज्यामध्ये ६ राज्यमंत्री असून आजपासून आम्ही आमचा गतिशील कारभार सुरू केलेला आहे. तसेच येत्या दोन दिवसात खातेवाटप सुरू करू. या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्यावर चर्चा, सत्तापक्ष आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा. त्यासोबत जवळपास २० विधेयक या अधिवेशनात येणार आहेत. मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले होते ते विधेयकामध्ये रूपांतरित होणार आहेत."
एवरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र : फडणवीस पुढे म्हणाले की, "या अधिवेशनात आमचा प्रयत्न चांगलं कामकाज करण्याचा आहे. विरोधी पक्षाने पत्र दिलं आहे. ते मागच्या अधिवेशनातील पत्रासारखेच आहे. त्यामध्ये फक्त ईव्हीएमचा एक मुद्दा समाविष्ट केला आहे. म्हणून विरोधकांनी बोलताना हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन असे म्हणाले. कारण पत्र ते जुनंच होतं. विरोधकांनी पत्रामध्ये जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्याची उत्तरे आम्ही वारंवार दिली आहेत. महाराष्ट्रामध्ये एक गतिशील सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ईव्हीएम संदर्भात आता एक फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्याचंही उत्तर आम्ही चर्चेदरम्यान देऊ. पण मला त्यांना सांगायचं आहे की, ईव्हीएमचा अर्थ एवरी वोट फॉर महाराष्ट्र असा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीनं महाराष्ट्रासाठी मतदान केलं आहे. म्हणून आमचं सरकार हे महाराष्ट्राच सरकार म्हणून एवरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र, तसा महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही कारभार करू."
संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार : "परभणीच्या घटनेमध्ये एका मनोरुग्णाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला. त्या मनोरुग्णाला अटक करण्यात आली आहे. दुर्दैवाने त्यानंतर एक उद्रेक झाला. असा असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं योग्य नाही. ते बाबासाहेबांना सुद्धा कधीच मंजूर झालं नसतं. हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे. आम्ही सर्वांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे, त्या शपथेप्रमाणे हे सरकार काम करेल." असंही फडणवीस म्हणाले.
विरोधकांचा आवाज आम्ही दाबणार नाही : "मला टार्गेट करण्याचा जो विषय आहे, त्याचं उत्तर या निवडणुकीनं दिलं आहे. तसेच बीडमध्ये सरपंचाची जी हत्या झाली त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे. काही जणांना सस्पेंड केलं. ३ आरोपी सापडले आहेत तर ४ आरोपींचा शोध सुरू असून हे प्रकरण सीआयडीला दिलं आहे. या केस संदर्भात संपूर्ण चौकशी करत असून कुठल्याही परिस्थितीत आरोपी कोणीही असला तरी त्याला सोडलं जाणार नाही. अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रात गांभीर्याने घेतल्या जातील. यामुळं एसआयटीच्या माध्यमातून सर्व धागेदोरे तपासले जातील. आमची सर्व प्रकारच्या चर्चेला तयारी आहे. विरोधी पक्षानं चर्चा करावी. कुठेही विरोधकांचा आवाज आम्ही दाबणार नाही. फक्त विरोधकांनी लोकसभेप्रमाणं चर्चेतून पळ काढून मीडियासमोर बोलू नये. सभागृहात बोलायचं नाही आणि मीडियासमोर बोलायचं, ही लोकशाही नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही योग्य पद्धतीनं देऊ हा विश्वास मी विरोधकांना देतो. विदर्भाच्या जनतेला सुद्धा योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू," असंही फडणवीस म्हणाले.
मी कुठेही नाराज नाही - एकनाथ शिंदे : याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी अभिनंदन करतो. ते पुन्हा जोमानं आले आहेत. महाविकास आघाडीनं बंद पडलेली सर्व कामे चालू केली. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघे २०० जागा जिंकणार होतो, परंतु दादा आल्यानं आम्हाला बोनस मिळाला आम्ही २३० जागा जिंकल्या. मी नाराज आहे अशा बातम्या तुम्ही वारंवार चालवता परंतु नाराज म्हणजे काय? याची व्याख्या तुम्ही सांगावी. मी कुठेही नाराज नाही. राज्याच्या जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला. तो सार्थ ठरवण्यासाठी आम्हाला काम करावं लागणार आहे. सर्वसामान्य जनतेचं सरकार कसं असतं हे आम्ही दाखवून दिलंय. अडीच वर्षाच्या काळात आमच्या कामाचा स्ट्राईकरेट हा देशात नंबर एक होता. म्हणून जनतेने विरोधकांना सुद्धा त्यांची जागा या निवडणुकीत दाखवली. विरोधी पक्ष नेता होईल इतकं ही संख्याबळ त्यांना मिळवता आलं नाही. विरोधी पक्ष चहापानाला आले नाहीत, कारण जनतेनेच त्यांच्यावर बहिष्कार घातला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्य अधिक प्रगतशील करायचं आहे."
हेही वाचा -
- महायुतीतील 39 आमदारांचा शपथविधी; भाजपा 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी घेतली शपथ
- "कोकणात असं काम करणार की, दिल्लीही मला बोलवेलं", मंत्रिमंडळातून डच्चू मिळ्यानंतर केसरकरांची प्रतिक्रिया
- "देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही" मंत्रिमंडळ विस्तारावर रामदास आठवले, नवनीत राणा नाराज