मुंबई Chhagan Bhujbal : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीतील जागा वाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय. महायुतीच्या जागावाटपा संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी आणि आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर देखील अमित शाह (Amit Shah) यांनी चर्चा केली तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीच्या जागावाटपसंदर्भात जितक्या जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला तितक्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्याव्यात असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केलीय.
जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित : लोकसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होईल तर दुसरीकडं महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपास संदर्भात बैठकावर बैठका सुरू आहे. महायुतीच्या जागा वाटप संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केलीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला जवळजवळ निश्चित झाला असून त्याची घोषणा लवकरच होणार असल्याचं समजतय.
जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला तितक्या जागा राष्ट्रवादीला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत दोन दिवसीय लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्ते, संपर्कमंत्री, पालकमंत्री यांच्या भावना समजून सर्वांना विश्वासात घेण्यात आलं. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर जोमानं कामाला सुरुवात केली जाणार आहे. महायुतीमध्ये आम्हाला दिलेलं आश्वासन पाळलं जाईल असा विश्वास असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसंच मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला जितक्या जागा दिल्या जातील तितक्याचा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही देण्यात याव्यात, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केलीय. महायुतीत भाजपा सर्वात मोठा घटक पक्ष आहे. जागावाटपा संदर्भात कार्यकर्त्यांना देखील विश्वासात घेतलं आहे. लोकसभा मतदारसंघ कोणाला सुटेल त्यापेक्षा त्या मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडून येईल यास प्रथम प्राधान्य दिलं जाणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
मुंबईत आढावा बैठक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 5 आणि 6 मार्चला 16 लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक मुंबई येथील महिला विकास मंडळ सभागृहात आयोजीत करण्यात आली होती. पहिल्या दिवशी नाशिक, दिंडोरी, गोंदिया-भंडारा, दक्षिण मुंबई, हिंगोली, धाराशीव, रायगड तर दुसऱ्या दिवशी कोल्हापूर, बुलडाणा, माढा, सातारा, शिरुर, बारामती, परभणी, अहमदनगर दक्षिण, गडचिरोली या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री संजय बनसोडे, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सर्व आमदार, माजी खासदार आदींसह पक्षाच्या सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -