चंद्रपूर Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे हे रविवारी नागपुरात आले आणि वाटेल ते बरळून गेले. मात्र, त्यांची अवस्था आता केविलवाणी झाली आहे. त्यांना कोणी विचारायला तयार नाही. मुख्यमंत्री बनण्यासाठी ते हातात कटोरा घेऊन फिरत आहेत. दिल्लीची वारी केली मात्र, त्यातही काही जमले नाही. त्यामुळं नैराश्यतून ते आता काहीही बरळत सुटले आहेत." अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केलीय.
ठाकरे यांनी एकतरी जागेवर निवडून येऊन दाखवावे : उद्धव ठाकरे हे नागपुरात येऊन देवेंद्र फडणवीस यांचं डिपॉसिट जप्त करण्याची भाषा करत आहेत. मात्र, माझं त्यांना खुलं आव्हान आहे. त्यांनी एखाद्या तरी जागेवरून निवडणूक लढून ती जिंकून दाखवावी. जागा कोणती तेही त्यांनीच ठरवावं असं आव्हान बावनकुळे यांनी दिलं.
उद्धव ठाकरेनी स्वीकारलं काँग्रेसचं हिंदुत्व : जामिनावर बाहेर असलेल्या अनिल देशमुख, दीडशे कोटींच्या घोटाळ्यात सहभागी सुनील केदार यांच्यासोबत बसण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार संपला आहे. त्यांनी काँग्रेसचं हिंदुत्व स्वीकारलय असंही बावनकुळे यांनी म्हटलं.
मोदी-शाह यांच्यामुळे 2019 मध्ये शिवसेनेला यश : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. उद्धव ठाकरे यांनी जेवढ्या सभा घेतल्या नाहीत त्यापेक्षा जास्त सभा त्यांनी घेतल्या. म्हणूनच शिवसेनेच्या इतक्या जागा निवडून येऊ शकल्या. मात्र ठाकरे यांनी बेईमानी केली. त्यांचं नेतृत्व हे कमजोर नेतृत्व होतं आणि म्हणूनच शिवसेनेचे 50 आमदार त्यांना सोडून गेले, असं बावनकुळे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार आल्यास योजना बंद होणार : जर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 'लाडकी बहीण योजना' बंद होणार, असं काँग्रेसचेच नेते म्हणत आहेत. ते महायुतीच्या सर्व योजना बंद करणार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली त्या ठिकाणी काँग्रेसनं केंद्राच्या अनेक योजना बंद केल्या. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मोदी सरकारला श्रेय मिळू नये म्हणून आकसापोटी केंद्र सरकारच्या 15 योजना बंद केल्या.
यावेळी जनता खोट्या प्रचाराचा बळी पडणार नाही : 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसनं खोटा प्रचार केला. संविधान धोक्यात येणार, लोकशाही धोक्यात येणार, ही शेवटची निवडणूक आहे हे नरेटिव्ह घेऊन ते जनतेसमोर गेले आणि जनता त्याला बळी पडली. मात्र, यावेळी जनतेला खरं काय ते समजलय. यावेळी जनता काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही.
मुख्यमंत्रीपदाची शर्यत नाही : आमचं एकच लक्ष्य आहे ते म्हणजे राज्यात महायुतीचं सरकार आणण्याचं. मुख्यमंत्री कोण बनणार याची शर्यत आमच्यात नाही. ते तिन्ही पक्षाचे नेते आणि दिल्लीतील वरिष्ठ यावर निर्णय घेणार आहेत असंही बावनकुळे म्हणाले.
कुणासोबत जायचं तो निर्णय जोरगेवारांनी घ्यावा : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे भाजपाकडून निवडणूक लढणार की शिवसेनेकडून याचा निर्णय जोरगेवार यांनी घ्यायचा आहे. आम्ही तोपर्यंत वाट बघू असंही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा -
- आनंदाची बातमी!,'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; कुणाला 4500 तर कुणाला 1500 रुपये - Ladki Bahin Yojana
- "पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार कशी?", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल - CM Eknath Shinde
- "विधानसभेत महाविकास आघाडीचा एन्काऊंटर..."; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीकास्त्र - CM Eknath Shinde