मुंबई Campaigning On Social Media : लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शुक्रवारी (19 एप्रिल) विदर्भात पार पडणार आहे. बुधवारी पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघातील प्रचार संपुष्टात आला. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोकांचा आणि मतदारांचा प्रतिसाद कमी असल्याचं पहायला मिळालं. तसंच यंदा रस्त्यावरील प्रचारापेक्षा पक्ष पदाधिकार्यांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झालंय. मात्र, असं असतानाच राज्यातील फुटलेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच काँग्रेस पक्षातील काही दिग्गजांनी भाजपात घेतलेली उडी, यासर्वांचा मोठा फटका उमेदवारांच्या प्रचाराला बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळंच रस्त्यावरील प्रचार कॅम्पिंग आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बघायला मिळतंय.
नेत्यांच्या निर्णयामुळं कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत : एका बाजूला राज्यात लोकसभा निवडणुकीला रंगत चढत आहे, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे की, ग्रासरूटवरील कार्यकर्ते प्रचारात उतरताना दिसत नाहीये. याचं कारण म्हणजे ज्या पक्षाच्या विचारधारा, नेत्यांविरुद्ध आजपर्यंत लढलो त्यांचाच प्रचार करण्याची वेळ आज कार्यकर्त्यांवर येऊन ठेपली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते केव्हा एकमेकांविरोधात जातील आणि कधी एकत्र येतील याविषयी कार्यकर्त्यांच्या मनात शंका असल्याचं, राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड म्हणाले. राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती निर्माण होण्यापूर्वी घटक पक्षातील नेते एकमेकांच्या विरोधात प्रचार करत होते. त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीतील कार्यकर्ते सध्या द्विधा मनस्थितीत असल्यानं प्रचारात जो माहोल हवा होता तो दिसत नाहीये.
पुढील टप्प्यात रंगत वाढेल : यासंदर्भात प्रतिक्रिया देत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, मुळात महाराष्ट्रातील तापमानाचा विचार केला पाहिजे. पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहे. जस जसे उमेदवारांचे अर्ज दाखल होतील, त्याप्रमाणे निवडणूक प्रचारात रंगत वाढेल. त्यासोबत कार्यकर्त्यांची सक्रियता देखील वाढेल, असा विश्वास अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
नियोजनबद्ध काम सुरू : पक्ष फुटीचा कोणताही परिणाम महायुतीच्या कार्यकर्त्यांवर झालेला नाही, असं शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ता संजू भोर पाटील म्हणाले. सर्व हिंदुत्व विचारासाठी काम करणारे कार्यकर्ते आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील उष्णतेची लाट महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम प्रचारावर होत आहे. तरी देखील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नसल्याचं मी म्हणणार नसल्याचंही संजू भोर पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करताय : यासंदर्भात प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले की,"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लाभार्थी आणि मलिदा गँग जरी एका बाजूला गेली असली तरी सामान्य कार्यकर्ता हा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा असून लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात अतिशय उत्साहाने काम करीत आहे. तसंच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष समन्वयानं काम करीत असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याची प्रचिती पाहायला मिळेल", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -