छत्रपती संभाजीनगर BJP Women meets Manoj Jarange : भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सोशल मीडियावर महिलांवर केली जाणारी अश्लील शेरेबाजी बंद करा अशी मागणी या महिलांनी त्यांच्याकडे केली. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत, आम्ही आमच्या पक्षाच्या जबाबदार पदाधिकारी असून, आम्हाला चुकीच्या भाषेत बोललं जातय. आपण माता-भगिनींचा सन्मान करतात, तर हे बंद करा असं या महिलांनी त्यांना ठणकावून सांगितलं. तर त्यांना संविधान भेट देत कायदा काय सांगतो, असं सांगण्याचा प्रयत्न भाजपा महिला आघाडीनं केला.
भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील शहरातील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर भाजपा महिला आघाडीनं रुग्णालयात प्रवेश करत, मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सध्या भाजपा विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा वाद रंगलेला दिसतोय. त्यावेळी भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या माहितीला उत्तर देताना, काही लोक अश्लील भाषेत उत्तर देत आहेत. इतकंच नाही तर महिला पदाधिकाऱ्यांच्या चारित्र्यावर देखील शिंतोडे उडवण्याचं काम केलं जातय. याविरोधात भाजपाच्या महिलांनी जरांगे पाटील यांना जाब विचारला. सोशल मीडियावर होणारं चारित्र्यहनन लवकर थांबवा अशी मागणीही महिलांनी केली. तसंच संविधान काय सांगतं याबाबत जरांगे पाटलांना आठवण करुन देण्यासाठी भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना संविधान दिलं.
कार्यकर्त्यांशी वाद : भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा मुंडे या आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात दाखल झाल्या. मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलत असताना मराठा आंदोलकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही काळ वाद निर्माण झाला होता, यात दोन्ही बाजूनं शाब्दिक वाद मोठ्या प्रमाणात झाला. जरांगे पाटील यांनी हा विषय त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा अनुयायांना सांगावं आणि असं असे कृत्य करू नये असं त्यांनी सांगावं, याकरता आम्ही आलो आहोत. त्यांनी जर त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत हा निरोप पोहोचला तर नक्कीच असं होणार नाही म्हणून आम्ही आलो, अशी माहिती महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा मुंडे यांनी दिली.
फडणवीस महिलांना पुढं करतात का : भाजपा महिला पदाधिकारी जरांगे पाटील यांना भेटून गेल्यानंतर त्यांनी रोष व्यक्त केला. भाजपाचे देवेंद्र फडणवीस आता महिलांना पुढं करत आहेत का? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण मान्य करणार नाही, मी कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागं घेणार नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस महिलांचा आधार घेत आहेत. या महिला गळ्यात भाजपाचा रुमाल न टाकता आल्या असत्या तर चांगलं वाटलं असतं. त्यांनी आपलं म्हणणं मांडावं, मात्र पक्ष म्हणून न मांडता बहीण म्हणून त्यांनी जर हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं असा टोला देखील जरांगे पाटील यांनी लगावला.
हेही वाचा :