मुंबई -भाजपानं एरोली मतदार संघातून गणेश नाईक यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. परंतु त्यांचे पुत्र, नवी मुंबईचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. अशातच भाजपानं त्यांना तिकीट नाकारल्यानं संदीप नाईक यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. संदीप नाईक हे २२ ऑक्टोबरला वाशी येथील कार्यक्रमात मंगळवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. संदीप नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल गणेश नाईक यांना विचारले असता, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना निवडणूक लढवण्यापासून आपण रोखणार नाही, असे ते म्हणाले आहेत.
मंदा म्हात्रे यांना उमेदवारी- २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. अशात यंदा उमेदवारीवरून सर्वच राजकीय पक्षात चढाओढ सुरू आहे. तिकीट न मिळालेले नाराज उमेदवार बंडखोरीच्या तयारीत आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून संदीप नाईक यांनी निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडं व्यक्त केली होती. परंतु, भाजपानं बेलापूरमध्ये विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी घोषित करून संदीप नाईक यांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे नाराज संदीप नाईक हे पक्षांतर करणार अशी चर्चा होती. परंतु ते तुतारी फुंकणार की मशाल पेटविणार, याबाबत संभ्रमावस्था होती. अखेर सोमवारी संदीप नाईक यांनी शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यावर हा संभ्रम दूर झाला आहे. आज मंगळवारी वाशी येथील एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार असल्याचा दावा एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं केला.
तिकीट नाकारल्यानं नाराज - भाजपानं विधानसभा निवडणुकीसाठीची जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ऐरोलीमधून विद्यमान आमदार गणेश नाईक तर बेलापूरमधून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होण्यापूर्वीच नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे मतदारसंघ आपल्यालाच मिळावेत, असा आग्रह गणेश नाईक आणि संदीप नाईक यांनी पक्षाकडे धरला होता. मा,त्र पक्षानं नाईक यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. याकरता तिकीट नाकारल्याने नाराज झालेले संदीप नाईक आता भाजपाची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन ‘तुतारी’ हाती घेणार आहेत. बेलापूर मतदार संघात तशा पद्धतीच्या हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत.
नाराजी किंवा वक्तव्याला किंमत नाही- संदीप नाईक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबद्दल बोलताना गणेश नाईक म्हणाले आहेत की," संदीप नाईक यांनी पक्षाचा आदेश मानावा. मी त्यांना समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण जर का त्यांना वाटत असेल की त्यांच्यावर अन्याय झाला आहे, तर त्यांना निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते जो निर्णय घेतील, तो त्यांचा निर्णय असणार आहे. पक्ष नेतृत्वानं घेतलेल्या निर्णयावर मी काही बोलू इच्छित नाही. भाजपामध्ये नाराजी किंवा वक्तव्याला किंमत नाही. लोकशाहीमध्ये कुणीच कोणाचा आवाज दाबू शकत नाही," असेही गणेश नाईक म्हणाले आहेत.
हेही वाचा-