मुंबई Madhav Bhandari : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारी मिळाली. शिवाय त्यांच्या मुलीला भाजपाकडून विधानसभेचं तिकीट मिळण्याचीही चर्चा आहे. यावरून आता भाजपामध्ये नाराजी पाहायला मिळतेय.
सोशल मीडिया पोस्ट : भाजपा उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या मुलानं सोशल मीडियाद्वारे आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. चिन्मय भंडारी यांनी 'X' वर एक लांबलचक पोस्ट टाकत वडील माधव भंडारी यांना पक्षानं 12 वेळा उमेदवारी नाकारल्याचं सांगितलं. तसेच या काळात ते आपल्या कामासाठी प्रसिद्धीपासून दूर राहिले आणि त्यांनी कधीही वैयक्तिक फायद्यासाठी आपल्या पदाचा किंवा प्रभावाचा दुरुपयोग केला नाही, असं चिन्मय भंडारी यांनी नमूद केलं.
संघटना उभारणीसाठी मदत केली : "माझे वडील 1975 मध्ये जनसंघ/जनता पक्षात सामील झाले होते. त्याला जवळपास 50 वर्षे झाली आहेत. बहुतेक लोक त्यांना ज्वलंत प्रवक्ते म्हणून ओळखतात. ते 2008 ते 2014 या काळात महाराष्ट्रातील यूपीए सरकारच्या विरोधात संतापाचे सर्वात प्रमुख आवाज बनले. परंतु ते त्यापेक्षा बरेच काही आहेत आणि त्यांनी त्यापेक्षा बरंच काही केलं आहे. या 50 वर्षात त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये संघटना उभारणीसाठी मदत केली. त्यांनी राज्यभरातील हजारो लोकांना आणि शेकडो गावांना मदत केली. त्यांनी लाखो जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे", असं चिन्मय भंडारी म्हणाले.
नेतृत्वाला प्रश्न विचारणार नाही : चिन्मय भंडारी यांनी पुढे लिहिलं की, "या दरम्यान मी 12 वेळा त्यांचं नाव विधानसभा किंवा विधानपरिषदेसाठी चर्चेत असल्याचं पाहिलं. मात्र प्रत्येक वेळा काही कारणांनी ते फायनल झालं नाही. मी नेतृत्वाला प्रश्न विचारण्याच्या किंवा न्याय मागण्याच्या कोणत्याही स्थितीत नाही. मला ते करायचंही नाही. कारण माझ्या वडिलांप्रमाणे माझाही पक्षावर विश्वास आहे."
व्यथा जाहीरपणे मांडली नाही : माधव भंडारी यांनी कधीही आपली व्यथा जाहीरपणे मांडली नसल्याचं ते म्हणाले. ज्या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातलं त्याला कधीही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांची तब्येत बिघडली तरी त्यांनी पक्षाचं काम कधीच थांबवलं नाही. याउलट, मी अनेक वेळा मंत्री किंवा खासदार राहिलेल्या लोकांना आपल्यावर 'अन्याय' झाल्याचं बोलताना पाहिलं आहे, असं चिन्मय भंडारी म्हणाले.
हे वाचलंत का :