नागपूर Protest in Nagpur : भाजपा नेता माजी आमदार तरविंदरसिंग मारवा यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत शहर काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं तर प्रभू श्रीराम आणि हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही निषेध करण्यात आला.
तरविंदर सिंगांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन : भाजपा नेते माजी आमदार तरविंदर सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एका आंदोलना-दरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी इथंच थांबावं अन्यथा भविष्यात तुमचीही अवस्था आजीसारखीच होईल. राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारत व शीखांचा अपमान केला आहे. परदेशी भूमीवर त्यांनी आपल्या देशाची बदनामी केल्याचं वक्तव्य केलं होतं. तरविंदर सिंग यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानं काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते चांगलेचं संतापलेले दिसत आहेत. तरविंदर सिंगांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन केलं. आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
ज्ञानेश महाराव आणि शरद पवार विरोधात भाजपा आक्रमक : प्रभू श्रीराम आणि हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज नागपूर येथील रामनगर चौक इथं भारतीय जनता पक्षानं ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सुद्धा निषेध करण्यात आला. देवीदेवतांबद्दल बोलण्याची ज्ञानेश महाराव याची लायकी नाही, त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्वरित माफी मागितली नाही, तर त्यांचं तोंड काळं करू असा इशारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान दिला. रामनगर परिसरात हे आंदोलन केल्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी हनुमान मंदिरात राम नामाचा जपही केला.
राहुल गांधींच्या पोटातलं ओठावर आलं : अमेरिकेत राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसपक्ष अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं आरक्षण संपवण्यासाठी प्रयत्नरत आहे असा आरोप करत भाजपानं नागपुरातील संविधान चौक इथं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत जोरदार निषेध केला. फक्त राहुल गांधीच नाही तर त्यांच्या घराण्यात आधीच्या पिढीनं सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमीच अवमान केला. जे काँग्रेसच्या पोटात होतं, तेच अमेरिकेत जाऊन राहुल गांधींच्या ओठावर आलं असा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरवर जोडे मारत निषेध तर व्यक्त केला. सोबतच जवळच्या चौकात राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आपला रोषही व्यक्त केला.
हेही वाचा :