मुंबई : महायुती सरकारचा भव्य-दिव्य शपथविधी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे पार पडणार आहे. शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही, याबाबत अस्पष्टता होती. या संभ्रमावस्थेबाबत शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी मोठी अपडेट दिली.
एकनाथ शिंदे सत्तेत सगभागी होणार : शिवसेनेच्या सर्व आमदारांची विनंती होती की, एकनाथ शिंदे यांनी सत्तेत राहावं आणि उपमुख्यमंत्री व्हावं, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना विनंती केली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार म्हटल्यावर आम्ही तसं पत्र राजभवनावरती येऊन दिले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली.
शिवसेना नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट : एकनाथ शिंदे हे सत्तेत सहभागी होणार आहेत, याबाबतची माहिती देण्यासाठी शिवसेना नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर आले होते. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते हे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात गेले होते. तिथे त्यांनी शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असलयाचं पत्र राज्यपालांना दिलं.
शिवसेना नेत्यांनी घेतली होती आक्रमक भूमिका : "मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यभरात चांगलं काम केलं आहे. अनेक लोककल्याणकारी योजना आणि विकासकामं केली आहेत. लाडकी बहीण योजनेमुळं ते सर्वांचे लाडके मुख्यमंत्री झालेत. तसेच आम्ही सर्व आमदारांनी त्यांना सत्तेत सहभागी व्हावे, यासाठी विनंती केली. जर एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी झाले नाहीत किंवा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नाही तर आम्ही कोणीही सत्तेत सहभागी होणार नाहीत," अशी भूमिका शिवसेना आमदार उदय सामंत यांनी घेतली होती. मात्र, अखेर त्यांनीच शिंदे हे सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती दिली.
हेही वाचा -