लखनऊ BJP Candidate Passes Away : भारतीय जनता पक्षाचे मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन झालंय. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी शनिवारी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. कुंवर सर्वेश यांना भाजपाकडून तिकीट मिळालं, तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते. ते कर्करोगानं त्रस्त होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी 19 एप्रिल रोजी या जागेवर मतदान झालंय. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त करत त्यांच्या निधनानं पक्षाची कधीही भरुन न येणारी हानी झाल्याचं म्हटलंय.
शक्तिशाली नेत्यांपैकी एक : पहिल्या टप्प्यात मुरादाबादमध्ये सुमारे 60 टक्के मतदान झालं होतं. तर याच जागेवर 2019 मध्ये 65.39 टक्के मतदान झालं होतं. सर्वेश सिंह यांच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या रुची वीरा रिंगणात आहेत. व्यवसायानं व्यापारी असलेले कुंवर सर्वेश सिंह हे उत्तर प्रदेशातील शक्तिशाली नेत्यांपैकी एक मानले जायचे. 2014 मध्ये सर्वेश सिंह मुरादाबादमधून खासदार झाले. खासदार होण्यापूर्वी ते ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये कंठ विधानसभा मतदारसंघात लाऊडस्पीकरच्या वादामुळंही सर्वेश कुंवर सिंह चर्चेत आले होते.
कुंवर सर्वेश सिंह यांचा राजकीय प्रवास : कुंवर सर्वेश सिंह यांचा जन्म 22 डिसेंबर 1951 रोजी झाला. सर्वेश सिंह यांनी 1991 मध्ये पहिल्यांदा भाजपाच्या तिकीटावर ठाकूरद्वारातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर सलग चार वेळा निवडणूक जिंकून ते विधानसभेत पोहोचले. 1991 नंतर सर्वेश सिंह यांनी 1993, 1996 आणि 2002 मध्ये सलग निवडणुका जिंकल्या होत्या. मात्र, 2007 मध्ये त्यांना बसपाच्या उमेदवाराकडून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. भाजपा नेते सर्वेश सिंह यांचा मुलगा सुशांत सिंह हा बिजनौरच्या बदापूर विधानसभेतून भाजपाचा आमदार आहे.
मुरादाबादमधून भाजपानं चौथ्यांदा दिली होती उमेदवारी : भाजपानं चौथ्यांदा मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून सर्वेश सिंह यांना उमेदवारी दिली होती. 2009 मध्ये त्यांनी माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. 2019 ची लोकसभा निवडणूकही लढवली, मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
हेही वाचा :