अमरावती Bacchu Kadu On Navneet Rana : भाजपानं अमरावती येथून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करताच महायुतीमध्ये वादाला तोंड फुटलंय. सुरुवातीपासूनच नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध करत असलेले प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आता अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच राणांचा प्रचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
काय म्हणाले बच्चू कडू? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना बच्चू कडू म्हणाले की, "नवनीत राणा यांना आमचा विरोध आहे आणि तो कायम राहील. नवनीत राणांच्या उमेदवारीला असलेल्या विरोधाबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली होती. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता आम्ही नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार देऊ, त्यासाठी आमच्याकडून चाचपणी सुरू आहे. राणांविरोधात उमेदवार देण्यात फायदा आहे की नाही हे आम्ही पडताळून पाहत आहोत." तसंच आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार अजिबात करणार नाही. आम्ही नवनीत राणांना शंभर टक्के पाडणार, असा दावाही त्यांनी केला.
आम्ही लाचारी पत्करणार नाही : पुढं ते म्हणाले की, "आता काम सरो वैद्य मरो अशी अवस्था झाली आहे. त्यांना एकंदरीत आमची गरज नाही. त्यामुळं आम्ही लाचारी पत्कारणार नाही. नवनीत राणा स्वतः भेटल्या तरी आमचा विरोध कायम राहील. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहू. यासर्व गोष्टींचा फटका कुणाला बसेल हा विचार आमच्यापेक्षा जास्त भाजपानं करायला हवा. त्यांनीच मीठाचा खडा टाकलाय", असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
...म्हणून शिंदेसोबत : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन करत दिव्यांगांचे प्रश्न निकाली काढले. या प्रश्नांसाठी गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही लढा देत होतो. दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठीच आम्ही शिंदेंसोबत गेलो. पण तरीही मला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे", असं ते म्हणाले. तसंच बेरोजगारांचे प्रश्न संपले नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न संपले नाही. फिनले मिल बंद झाला, शकुंतला रेल्वे सुरू झाली नाही, असे कोणतेच प्रश्न सत्ता असतानाही सरकारनं सोडवले नसल्याची नाराजी कडू यांनी यावेळी व्यक्त केली. अबकी बार 400 पार चा नारा बीजेपी लावत आहे. परंतू, त्यांना फक्त 300 सीटांची गरज आहे. त्यामुळं नवनीत राणाचं एक सीट निवडून नाही आलं तरी चालेल, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -