मुंबई Ramesh Chennithala On Ashok Chavan : काँग्रेसचे कार्यकारी समितीचे सदस्य आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीपूर्वी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. विविध विषयांसह महाविकास आघाडीच्या जागावाटपा बाबतही चर्चा झाल्याची माहिती रमेश चेन्नीथला यांनी दिली. या बैठकीनंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, सतेज पाटील, वर्षा गायकवाड, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम उपस्थित होते.
कारण स्पष्ट करावं : त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना कॉंग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, "अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत जाण्याचं कारण स्पष्ट करावं. काँग्रेसनं त्यांना सर्व पदे दिली, दोन वेळा मुख्यमंत्रीपद दिलं. तरीही ते जर भारतीय जनता पार्टीत जात असतील तर त्यामागची कारणं ईडी आणि सीबीआय हीच आहेत." तसंच अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणीही आमदार आता जाणार नाहीत. सर्वजण पक्षात आहेत आणि पक्षासोबतच राहतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
भाजपा ही वॉशिंग मशीन : पुढं ते म्हणाले, "भाजपाने अशोकराव चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्यात आरोप केले होते. आता त्याच अशोकराव चव्हाण यांना त्यांनी आपल्या पक्षात सामावून घेतलं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घ्या आणि पापं धुवून टाका, असं रुढ केलं जातंय. अजित पवार यांच्यावरही 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा असल्याचा आरोप भाजपानेच केला आणि त्यांना पक्षात घेत त्यांचं शुद्धीकरण केलं. भाजपाने ज्यांच्यावर आरोप केले त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतलं आहे, भाजपा ही वॉशिंग मशीन आहे."
नेते गेले आणि कार्यकर्ते आमच्यासोबत : पक्षातील काही नेते जरी गेल्या काळात ईडी सीबीआयच्या भीतीने भाजपात गेले असले, तरीही पक्षातील हजारो कार्यकर्ते हे आमच्या सोबतच आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद हा सर्वेक्षणाच्या माध्यमातून उघड होत आहे. त्यामुळं पायाखालची वाळू सरकलेल्या भाजपानं महाविकास आघाडीला कमकुवत करण्यासाठी ही पावलं उचलली आहेत. मात्र, यामुळं पक्ष कुठंही कमकुवत होणार नाही. उलट अधिक जोमानं आम्ही काम करू आणि जनता आम्हाला साथ देईलच, असा विश्वासही चेन्नीथला यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यसभा उमेदवाराबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील : शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीसंदर्भात बोलत असताना चेन्नीथला म्हणाले,"आमच्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत चर्चा झाली. इतर राजकीय विषयावर देखील चर्चा झाली आहे. तसंच दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळं लवकरात लवकर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल. येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत." तसंच राज्यसभा उमेदवारा बाबत काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
चव्हाण यांनी स्वगृही परतावे : यावेळी बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले,"अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त न करता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं अशोकराव चव्हाण स्वगृही परतणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. भाजपाचे किंवा महायुतीचे मनसुबे आम्ही सफल होऊ देणार नाही. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं जोरदार काम करीत आहोत. येत्या 15 आणि 16 तारखेला आम्ही शिबिर आयोजित केलं आहे. लोणावळा येथील या शिबिरानंतर 17 तारखेला आमच्या पक्षाची महत्त्वाची बैठक होईल आणि त्यात आगामी रणनीती निश्चित केली जाईल. एकूणच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही अत्यंत जोरदारपणे रिंगणात उतरणार आहोत", असं पटोले यांनी सांगितलं.
हेही वाचा -