अमरावती Amravati Lok Sabha voting : अमरावती लोकसभा मतदारसंघात आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीय. निवडणुकीच्या मुहूर्तासह आज मोठ्या संख्येनं लग्नदेखील आहेत. अमरावतीच्या वडरपुरा परिसरातील नवरदेव लग्नासाठी वऱ्हाड घेऊन वर्धा इथं पोहोचणार होता. मात्र, त्यापूर्वी त्यानं वऱ्हाडासह मतदान केंद्रावर पोहोचून त्यानं मतदानाचा हक्क बजावलाय.
वऱ्हाडी पोहोचले मतदान केंद्रावर : अमरावती शहरातील वडारपुरा परिसरातील आकाश पवार या युवकाचं आज वर्धा इथं लग्न आहे. लग्नाआधी मतदानाचं कर्तव्य बजावण्यासाठी आकाश पवार आपले आई-वडील तसंच वडारपुर येथील महापालिकेच्या शाळेत असणाऱ्या मतदान केंद्रावर पोहोचला. लग्नाचे सारे वऱ्हाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले. वर्धा इथं देखील आज मतदान होणार आहे. त्यासाठी नववधूदेखील वर्धेत आधी मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता आमचं लग्न होणार असल्याचं आकाश पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
अमरावतीत सकाळपासून रिमझिम पाऊस : अमरावती शहरात गुरुवारी रात्री विजांचा कडकडाट आणि वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. आज सकाळीदेखील काळे ढग आकाशात दाटून आले आहेत. तसंच सकाळी सात वाजल्यापासून रिमझिम पाऊस देखील बरसतोय. कडाक्याच्या उन्हामुळं अमरावतीकर त्रस्त असताना आज मतदानाच्या दिवशी ढगाळ वातावरण आहे. असे असले तरी मतदानाचा टक्का निश्चितच वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अमरावतीत 1983 मतदान केंद्रावर मतदान : अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 78 मतदार आहेत. या मतदारांना मतदान करण्यासाठी एकूण 1983 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आलीय. यापैकी बडनेरा विधानसभा मतदारसंघात 337 मतदान केंद्र आहेत. अमरावती विधानसभा मतदारसंघात 322, तिवसामध्ये 319, दर्यापूरमध्ये 342, मेळघाटात 354 आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघात 309 मतदान केंद्र आहेत. तर लोकसभेच्या रिंगणात एकुण 36 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. मात्र मुख्य लढत भाजपाच्या नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात होत आहे.
हेही वाचा :