मुंबई : ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांनी उच्च न्यायालयात आपल्याविरोधात केलेली निवडणूक याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी शिवसेनेचे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलीय. रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला दिलेल्या आव्हान याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे.
वायकरांची खासदारकी रद्द करा: रवींद्र वायकर यांची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील अॅड अनिल साखरे यांनी या याचिकेत अनेक बाबींचा उल्लेख नसल्याने ही याचिका नामंजूर करावी, अशी मागणी केली. या याचिकेतील काही परिच्छेद वगळण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे या प्रकरणी त्यांनी लेखी उत्तर न्यायालयात सादर केलंय. रवींद्र वायकर यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर सादर करण्यास अमोल कीर्तिकर यांचे वकील अॅड अमित कारंडे वेळ मागितला, त्यावर न्यायालयाने चार आठवड्यांचा वेळ दिला आणि पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार असल्याचं स्पष्ट सांगितलं. कीर्तिकरांच्या या याचिकेवर यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान रवींद्र वायकर आणि इतर प्रतिवाद्यांना उच्च न्यायालयाने नोटीस काढून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. रवींद्र वायकर यांची खासदारकी रद्द करावी आणि त्यांच्या जागी आपल्याला विजयी उमेदवार म्हणून घोषित करावे, अशी मागणी अमोल कीर्तिकर यांनी या याचिकेद्वारे उच्च न्यायालयासमोर केली आहे.
वायकरांच्या विजयात गोंधळ: 29 जुलैला कीर्तिकर यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली होती, त्यावेळी न्यायालयाने खासदार रवींद्र वायकर यांच्यासहित मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सर्व 19 उमेदवारांना समन्स पाठवून वायकर आणि इतरांना बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. कीर्तिकर यांनी त्यांच्या पराभवात आणि वायकर यांच्या विजयात गोंधळ झाल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करून वायकर यांची निवड रद्द करावी आणि अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांना 4 लाख 52 हजार 644 मते मिळाली होती. तर पराभूत अमोल कीर्तिकर यांना 4 लाख 52 हजार 596 मते मिळाली होती. अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर यांच्याकडून कीर्तिकर हे पराभूत झाले होते.
नेमकं प्रकरण काय?: मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर हे विजयी होऊन खासदार झालेत, तर शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर हे वायकरांसमोर पराभूत झाले होते. या निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी गैरप्रकार झाल्याचा आरोप करत अमोल कीर्तीकर यांनी वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय, त्यावर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
हेही वाचा -