अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपा, मविआ आणि वंचितनं उमेदवार जाहीर केले आहेत. या लोकसभा निवडणुकीत तिहेरी लढत पहावयास मिळत आहे. मात्र, तिहेरी लढतीत महाविकास आघाडीनं प्रचारात मोठी आघाडी घेतल्यानं भाजपाला आपला बालेकिल्ला राखण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची आज सभा आयोजित करण्यात आली आहे.
भाजपातील पदाधिकाऱ्यांची नाराजीला दूर करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा हा महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपानं ऐनवेळी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीसोबत जागवाटपावरून मतभेद झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केले. मविआनंही आपला उमेदवार देत मराठा कार्ड म्हणून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे अनुप धोत्रे आणि मविआचे डॉ. अभय पाटील हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावित आहेत.
संजय धोत्रे यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांचा तीनवेळा पराभव- सूत्राच्या माहितीनुसार भाजपाच्या माजी खासदाराच्या पुत्राला लोकसभेची उमेदवारी दिल्यानं भाजपाचे अनेक नेते नाराज आहेत. त्यासोबतच पक्ष तर सोडाच राजकारणाशी तिळ मात्रही संबंध नसलेल्या अनुप धोत्रेंना उमेदवारी देऊन भाजपानं पक्षातीलच इच्छुक आणि बड्या नेत्यांच्या तोंडचा घास पळविल्यानं पक्षात नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे, अकोला लोकसभा मतदारसंघातून चारवेळा भाजपाचे नेते संजय धोत्रे हे निवडून आले आहेत.
मविआच्या उमेदवाराची वर्षभरापासून तयारी- मविआकडून उमेदवारी मिळविलेले कॉँग्रेसचे नेते डॉ. अभय पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदु परिषदेत काम केलं आहे. ते गेल्या काही वर्षांपासून कॉँग्रेससोबत आहे. मागील २०१९ लोकसभा निवडणुकीत त्यांना कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्यानं त्यांचा हिरमोड झाला. २०२४ मध्ये उमेदवारी मिळेल, या आशेनं त्यांनी वर्षभरापासूनच प्रचाराची तयारी सुरू केली. मविआची जागावाटपासाठी वंचितबरोबर बोलणी सुरू असतानाही त्यांनी प्रचार तसेच ग्रामीण भागात भेटीगाठी सुरूच ठेवल्या होत्या.
पक्षातील नाराजी दूर करण्याचं भाजपा पक्षश्रेष्ठींसमोर आव्हान- भाजपामध्ये प्रचंड नाराजी असल्याने पक्षाकडून आधी मुख्यमंत्री योगी यांची सभा घेण्याचे ठरलं होतं. परंतु, त्यांची सभा रद्द करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज सभा घेण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही सभेला हजर राहणार आहेत. गटातटाच्या राजकारणात अनुप धोत्रेंसाठी ही निवडणुक कशी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा-