पुणे Ajit Pawar Vs Sharad Pawar : निवडणूक आयोगानं 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या पारड्यात टाकलं आहे. यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
पक्ष हिसकावून घेतला जातोय : "निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवारांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल, याची आम्हाला खात्री आहे", अशी प्रतिक्रिया शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं : "केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे! #लडेंगे_और_जितेंगे!", असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
लोकशाहीची हत्या : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने लिहून दिलेला आहे, निवडणूक आयोगाने तो फक्त जाहीर केला. काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात एकही प्रादेशिक पक्ष अस्तित्वात राहणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर संस्था आणि निवडणूक आयोगाने मोदी सरकारच्या आदेशाने प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात केली आहे. अगोदर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जे झाले ते लोकशाहीची हत्या करण्याचाच प्रकार आहे. मोदी सरकार आणि निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे."
सत्ताधाऱ्यांकडून निकालाचं स्वागत- उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, " आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो."अजित पवार गटानं निकालाचं स्वागत केलं आहे. अजित पवार गटानं म्हटल आहे की, निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणं स्विकारत आहोत. या निकालानं आमच्या समोरची जबाबदारी आणखीनं वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढं वृद्धिगंत करण्यासाठी आम्ही कालही कटीबध्द होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू हा विश्वास जनतेला देतो. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत आभार व्यक्त करतो.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "अजित पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल महत्त्वपूर्ण आहे. नियमाप्रमाणे आणि संविधनाप्रमाने हा निर्णय दिला आहे." तसंच ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ त्यांच्याकडे हा निकाल लागला असल्याचंही यावेळी बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा -