सातारा Ajit Pawar News : हल्ली राजकारणात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. काही पण बोलतात. कोण खेकडा म्हणतो, कोण वाघ म्हणतो. ज्यावेळी आपण दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतो. त्यावेळी अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना फटकारलं.
जागा वाटपाचा सन्मानजनक तोडगा निघेल : प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजितदादा म्हणाले की, आपण दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. त्यांनी राज्याला चांगला मार्ग दाखवलाय. त्या मार्गाने सगळ्यांनी पुढं गेलं पाहिजे. दिल्लीतील पुढे ढकललेली भाजपा पार्लमेंटरी बोर्डाची बैठक उद्या किंवा आजही होऊ शकते. सर्वांचा मान-सन्मान राखला जाईल, अशा पद्धतीचा तोडगा काढण्याचा प्रयत्न असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.
सर्वांनीच सुसंस्कृतपणा दाखवावा : माजी मंत्री विजय शिवतारेंच्या वक्तव्यासंदर्भात ( Vijay Shivtare Controversial Statements) अजित पवार म्हणाले की, सर्वांनीच सुसंस्कृतपणा दाखवावा. शिवतारेंबद्दल वरिष्ठ पातळीवर काय तो निर्णय घेतील. परंतु, महायुती आणि घटक पक्षांच्या नेत्यांनी वातावरण गढूळ होईल, अशी वक्तव्ये करू नयेत. विद्यमान खासदार असतील त्या जागा ज्या-त्या पक्षाला सोडायची चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भातील अंतिम चित्र लवकरच स्पष्ट करावं लागणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
दोन दिवसात आचारसंहिता लागू होईल : देशात १४ किंवा १५ तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता अजित पवार यांनी वर्तवली. राष्ट्रवादीला कमी जागा मिळणार, ही मीडियातील चर्चा आहे. त्यात काही तथ्य नसल्याचंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच आमदार नीलेश लंके यांनी कालच माध्यमांसमोर त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर परत मी उत्तर देण्याचं कारण नाही, बारामतीच्या व्यापाऱ्यांनी मेळावा रद्द केल्याचं मला माहिती नाही. मी बाहेर आहे. असं कधी होत नाही, परंतु बारामतीला गेल्यावर माहिती घेईन, असं अजित पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा -