पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, " ज्या वेळेस काही करायचं असतं, तेव्हा ते (शरद पवार) सांगतात की, हे मी माझ्या पद्धतीनं मला जे वाटतं ते केलं आहे. कधी-कधी संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठीदेखील अशी विधाने येत असतात. त्यांनी उद्धव ठाकरे यांचादेखील उल्लेख केला. पण मला नाही वाटतं की, उद्धव ठाकरे हे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. गेली अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांना जवळून पाहिलं आहे."
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वकील मेळाव्याच्या आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांना विचारलं. त्यावर अजित पवार म्हणाले की " पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सोबत घेतात. त्यांना पाहिजे तेच ते निर्णय घेत असतात. पण दाखवताना असं दाखवतात की, हा सामूहिक निर्णय आहे. त्यांच्या मनात जे असतं, तेच ठामपणे करत असतात."
राजकारणात कोणीही कोणाचं शत्रू नसतो-उपमुख्यमंत्री- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सातत्याने सभा घेत आहेत. यावर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की "साहेब त्यांना जे वाटत तेच करत असतात. आम्ही अनेक वेळा सांगत होतो की, तुम्ही एखादी सभा घ्या, पण ते ऐकत नव्हते. त्यांना पाहिजे तेच करत असतात." राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या लोकांना पुन्हा त्यांच्या पक्षात 'नो एंट्री' असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. यावर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की" निलेश लंके यांनी पक्ष सोडला होता. त्यांना 'वेलकम' केलं ना? हे फक्त सांगायचं असतं. यात काहीही तथ्य नाही. राजकारणात कोणीही कोणाचं शत्रू नसतो. लोकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करायची असते. तसंच बारामतीच्या जागेबाबत अजित पवार यांना विचारला असता ते म्हणाले की," मी ज्योतिष नसून जागा जिंकून येईल एवढं विश्वास आहे."
चंद्रकांत पाटील यांनी चुकीचं वक्तव्य केलं- अजित पवार- "महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लोकसभा निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं," असं वक्तव्य बुधवारी आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की" हे खोटं आहे. रोहित पवार यांच अलीकडे संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे ते काहीही बडबड करत आहेत." बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळेस भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला पवारांचा पराभव करायचा आहे, असे वक्तव्य केलं होतं. यावर अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, " त्यांनी जे विधान केलं होत, त्याला काहीही अर्थ नव्हता. आम्ही चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो की, तुम्ही पुण्यातच काम बघा. मी बारामतीत जे काही असेल ते पाहतो. त्यांनी ते बोलायला नको होतं. पवार साहेब जर उभे नव्हते, तर त्यांचा पराभव करण्याचा विषयच येत नाही. त्यांनी जे बोललं ते चुकीचं होत. त्यांनी असं बोलायला नको होतं," असं यावेळी पवार म्हणाले.
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत काय म्हटले?
- शरद पवारांच्या मनात असतात तेच निर्णय घेतात. निर्णय सामूहिक असल्याचे दाखवितात, पण तेच निर्णय घेतात. कधी कधी संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य करतात. अनेकदा संशयकल्लोळ निर्माण करण्याचा प्रयत्न असतो.
- शरद पवार कुणाचेही ऐकत नाही. त्यांच्या मनाचे सगळं करतात.
- शरद पवार काय बोलतात हा त्यांचा निर्णय आहे.
- अमित शाह हे राज्य चालवितात हे खोटे आहे.
शरद पवारांनी मुलाखतीत काय म्हटलं? राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी एका मराठी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पुलोदचा प्रयोग, भाजपासोबत जाण्याची चर्चा यावर भाष्य केलं. शरद पवार यांनी म्हटले, " भाजपासोबत जाण्या आमचा कधीच निर्णय झाला नव्हता. मात्र, समोर चर्चा झाल्या होत्या. राजकीय संवाद झाला होता, याचा अर्थ निर्णय झाला, असा होत नाही. आम्ही सगळे मिळून निर्णय घेतो, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मुलाखतीत सांगितले. त्यांनी अजित पवारांच्या बंडावर भाष्य करण्यास नकार दिला. पुढे ते म्हणाले, " अमित शाह यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राजकारण होत असेल तर जनता स्वीकारणार नाही. पुलोदचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग यात बिलकूल साम्य नाही. तेव्हा भाजपा नव्हे जनसंघ नावाचा पक्ष होता. जनसंघ पुलोदमध्ये असताना आताची आणि तेव्हाच्या स्थितीत खूप फरक आहे."
हेही वाचा-