मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पक्षातील विधानसभेच्या निवडणुकीतील (Maharashtra Assembly Election 2024) पराभूत उमेदवारांची बैठक देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी महायुतीतील मित्र पक्षांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचा मुद्दा अजित पवारांसमोर मांडला. पवारांनी यावेळी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसंच पराभव झाला असला तरी पक्ष तुमच्या पाठीशी पूर्ण क्षमतेनं उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी उमेदवारांना दिली.
बैठकीला कोण-कोण उपस्थित : पराभूत उमेदवारांच्या बैठकीत त्यांचे विचार जाणून घेऊन पक्ष अधिक बळकट करण्यासाठी पवारांनी पावले उचलण्यास प्रारंभ केलाय. शुक्रवारी (6 डिसेंबर) झालेली बैठक हा त्याचाच एक भाग होता. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पुढील सर्व निवडणुकीत पक्षाला यश मिळेल यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी पवारांनी दिल्या. देवेंद्र भुयार, अतुल बेनके, राजेश पाटील यांसह अनेक पराभूत उमेदवार या बैठकीला उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळं शरद पवारांच्या पक्षातून बाहेर पडलेल्या अजित पवारांच्या पक्षालाच मतदारांनी खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणून ओळख मिळवून दिलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा नव्यानं राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवून देण्याचं उद्दिष्ट अजित पवारांनी डोळ्यासमोर ठेवल्याचं बघायला मिळतंय.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला किती मंत्री पदं? : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नवे सरकार गुरुवारी अस्तित्वात आले. मात्र, शपथविधी सोहळ्यात केवळ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी अद्याप शपथ घेतली नसल्यानं तिन्ही पक्षातील इच्छुक आमदारांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडं लागलंय. हा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या विस्तारात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 8 ते 10 आमदारांना मंत्री पदाची संधी मिळेल, असं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -