पुणे : राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होताना पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर आज (2 नोव्हेंबर) बारामतीत दोन दिवाळी पाडव्याचे कार्यक्रम पाहायला मिळाले. दोन्ही पवारांकडे राज्यभरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आलेले पाहायला मिळालं. दोन्ही पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी यातून आपापली ताकद दाखवली असल्याचं देखील सांगितलं जात आहे.
दोन्ही पाडव्यामध्ये मोठी गर्दी : बारामतीमध्ये आज दोन दिवाळी पाडवा पाहायला मिळाले. गोविंदबाग येथे शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब आणि राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे बारामतीमधील काटेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील यंदा दिवाळी पाडव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोन्ही पाडव्यामध्ये लोकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.
पवार कुटुंबात आरोप-प्रत्यारोप : राष्ट्रवादी फुटीनंतर मागच्या वर्षी अजित पवार हे गोविंदबाग येथील दिवाळी पाडवा कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केलं. यानंतर खऱ्या अर्थानं पवार कुटुंबात एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरू झाले. लोकसभा निवडणुकीत एकीकडे शरद पवारांना भावनिक साथ मिळत गेली. त्यावेळी अजित पवार यांनी भावनिक होऊ नका, असं आवाहन देखील लोकांना केलं होतं. पण अखेर काका पुतण्याच्या या लढाईत काकांनी बाजी मारत सुप्रिया सुळे विजयी झाल्या. आता देखील तशीच परिस्थिती निर्माण झाली आणि या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळत आहे.
कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर : बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली. आता बारामतीत लोकसभेप्रमाणेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होताना पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी आजही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनात दोन्ही पवार एकत्र असल्याच्या भावना होत्या. अनेकदा याच कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही पवार एकत्र आहे की काय? असा संभ्रम देखील निर्माण झाला. मात्र, आज तो संभ्रम या दिवाळी पाडव्यानिमित्त दूर झाला. एकीकडे शरद पवार यांच्या उपस्थितीत गोविंदबाग येथे संपूर्ण पवार कुटुंबीयांचा दिवाळी पाडवा आयोजित करण्यात आला होता. तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील कुटुंबासोबत त्यांच्या घरी म्हणजेच काटेवाडी येथे दिवाळी पाडवा कार्यक्रम आयोजित केला होता. आता येणाऱ्या काळात अश्या पद्धतीनं बारामतीत दोन पाडवा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील, असं वक्तव्य खुद्द अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलं आहे.
मी अस्वस्थ, शरद पवार : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले, "अनेक वर्षाची परंपरा आहे की, याठिकाणी पाडवा साजरा केला जातो. याच प्रांगणात आम्ही सगळे जमत असतो. ही जुनी पद्धत आहे. ही पद्धत कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. लोकांना दोन ठिकाणी जावं लागलं आणि थोडा त्रास झाला यामुळं मी अस्वस्थ आहे."
लोकांची मते काय - यावेळी अजित पवार यांच्या पाडवा कार्यक्रमात आलेल्या लोकांना त्यांच्या भावना विचारल्या असता, अजित पवार यांनीच लोकांची कामं केली असल्यानं त्यांच्याबद्दल आदर असल्याचं सांगितलं. त्याचवेळी दुसऱ्या एका पवार चाहत्याला विचारलं असता, आता दोन्ही ठिकाणी पाडवा कार्यक्रमाकरता जावं लागत आहे. एकत्र होते ते चांगलं होतं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पाडवा कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांची संख्या मोठी होती.
बारामतीची जनता कोणाला साथ देणार : सद्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण असल्यानं मताचं दान मात्र स्थानिक लोक कुणाच्या पारड्यात टाकतात ते पाहावं लागेल. आज सकाळपासून बारामतीत दोन्ही पवारांकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी हे दोन्ही पवारांची भेट घेण्यासाठी आलेले पाहायला मिळाले. दोन्ही पवारांनी बारामतीत या विधानसभा निवडणुकीसाठी आपली ताकद दाखवली असल्याची चर्चा होत असली, तरी आत्ता या विधानसभा निवडणुकीत बारामतीची जनता काका की पुतण्या? कोणाला साथ देतील हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
हेही वाचा