मुंबई Praful Patel Clean Chit : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना सीबीआयनं आज (28 मार्च) मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल करत पटेल यांना क्लीनचीट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयनं दिल्ली येथील राऊस अव्हेन्यू न्यायालयात याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. तसंच 2017 मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचंही सीबीआयनं म्हटलंय.
क्लीन चीट देऊन तपास बंद : नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियासाठी विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी सीबीआय करत होती. तब्बल सात वर्ष या प्रकरणाचा तपास केल्यानंतर आता सीबीआयनं प्रफुल पटेल, एमओसीए आणि एअर इंडियाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना क्लीन चीट देऊन हा तपास बंद केला आहे.
काय आहे प्रकरण? : कथित भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्यावर सरकारचे 840 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयानं 2017 मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा असे आदेश दिले होते. या आदेशानंतर या सर्व कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केला होता. आता सीबीआयनं प्रफुल्ल पटेल विरुद्ध एअर इंडिया लीजिंग प्रकरणाच्या संदर्भात क्लोजर रिपोर्ट कोर्टात दाखल केलाय.
सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा फायदा? : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भाजपाबरोबर सत्तेत सामील झाले. त्यानंतर वर्षभराच्या आतच त्यांना सीबीआयकडून मोठा दिलासा मिळालाय. त्यामुळं यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे.
हेही वाचा -