मुंबई Children Aid Society : दि चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या वतीनं मुंबईतील मुलांची विशेष बालगृह आणि अनाथआश्रम चालवण्यात येतात. सोसायटीच्या अखत्यारीत मुंबईतील मानखुर्द आणि बोरला येथे खारपानपट्ट्यातील शेकडो एकर जमीन आहे. ही जमीन राज्य सरकारकडून भाडेतत्त्वावर देण्यात आली असून या जमिनीचा भाडेपट्टा संपुष्टात येणार असल्यानं हा भाडेपट्टा वाढवून देण्यात येणार असल्याचं, महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.
महिला बाल विकास विभागाची कार्यालयं : मोकळ्या असलेल्या या जागेवर अतिक्रमण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळं या जागेवर केवळ चिल्ड्रन एड सोसायटी असं नाव न लिहिता महिला आणि बालविकास विभाग राज्य शासन असं लिहावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच या मोकळ्या जागेवर आता राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महिला आणि बालविकास भवन, एकात्मिक बालविकास सेवा योजना, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ इत्यादी प्रकल्प सोसायटीची कार्यालय या मोकळ्या जागेत उभारण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असंही तटकरे यांनी सांगितलं. यामुळं महिला आणि बाल विकास विभागाची विविध कार्यालयं विखुरलेल्या आणि तोकड्या जागेत आहेत. ती एकाच ठिकाणी आणता येतील, त्यामुळं कार्यप्रणाली सोपी होईल, असंही त्या म्हणाल्या.
विलीनीकरणाचा निर्णय लवकरच : दि चिल्ड्रन सोसायटी मुंबईच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करून ही सोसायटी महिला आणि बालविकास विभागात विलीन करण्याबाबत उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. त्यानंतर या सोसायटीच्या आस्थापनेवरील रिक्त असलेली पदं भरण्याबाबतही निर्णय घेतला जाणार असून सुमारे 58 पदे त्यानुसार भरली जातील, असंही तटकरे यांनी सांगितलं. तसंच शासनाच्या नव्या नियमानुसार यापुढं डी चिल्ड्रन सोसायटी मुंबईमार्फत संचालित मंदबुद्धी बालगृह ऐवजी दि चिल्ड्रन्स एड सोसायटी मुंबई संचालित दिव्यांग मुलांचे विशेष बालगृह या नावानं चालवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसंच दिव्यांग कायद्यानुसार हा बदल करण्यात येणार असल्याचंही आदिती तटकरे यांनी सांगितलंय.
हेही वाचा -