मुंबई Vidhan Sabha Election 2024 : आम आदमी पार्टी महाराष्ट्रात 2024 ची विधानसभा निवडणूक स्वबळावर पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचं बोललं जात आहे. राज्यातील सर्व 288 मतदार संघात उमेदवारांची चाचपणी 'आप'ने सुरू केली आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पक्षाने आवाहन केलं असून लिंक उपलब्ध करून दिली आहे.
आमची आघाडी ही 'इंडिया' आघाडीसोबत लोकसभा निवडणुकीमध्ये होती. विधानसभा निवडणूक आम्ही स्वबळावर लढवण्याची तयारी करत आहोत. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचा उमेदवार रिंगणात असेल यासाठी आम्ही इच्छुक कार्यकर्त्यांकडून अर्ज भरून घेत आहोत. - धनंजय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष, आम आदमी पक्ष
महाराष्ट्रातील जनतेला 'नवीन' पर्याय : "दिल्ली आणि पंजाबप्रमाणे शिक्षण, वीज, आरोग्य, पाणी, महिला सबलीकरण, बेरोजगारी, महागाई, शेतीला हमीभाव, शेतकऱ्यांचे हक्क यासह मूलभूत सुविधांवर काम करण्याची इच्छा असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आम्ही निवडणूक लढवण्याची संधी देऊ. राज्यातील विद्यमान फोडाफोडीचे राजकारणाला आणि प्रस्थापित पक्षांच्या भ्रष्ट राजकारणाला कंटाळलेल्या महाराष्ट्रातील जनतेला 'नवीन' पर्याय देऊन भ्रष्टाचार विरहित सुशासन आणण्याचा आमचा मानस आहे," अशी माहिती 'आप'चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी दिली. आम आदमी पक्षाने केवळ त्यांच्या पक्षातील इच्छुकांनाच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रात बदल घडवण्याची इच्छा असणारे व त्यासाठी काही करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.
इच्छुकांकडून मागवले अर्ज : "पक्षाचे राज्यातील नेतृत्व देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने, 'आप'ने पक्षातील इच्छुक कार्यकर्ते व इतर इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. त्यामुळं पक्षाचे राज्यस्तरीय पदाधिकारी असलेल्या नेत्यांना रिंगणात उतरवण्याचा पक्षाचा विचार आहे. महाराष्ट्रातील जनतेला एक नवीन सक्षम आणि सशक्त पर्याय देण्यासाठी आम्ही 'आप'च्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळेल," असा विश्वास धनंजय शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू : "सध्या महाराष्ट्राचे विधिमंडळात आम आदमी पक्षाचा एकही आमदार नाही. त्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून उभ्या राहणाऱ्या उमेदवारांपैकी किती जण विजयी होतात आणि विधिमंडळात आमदार म्हणून प्रवेश करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी देखील आम आदमी पक्षाने तयारी सुरू केली आहे. सध्याच्या राजकारणाला कंटाळलेल्या नागरिकांना एक चांगला पर्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे," असंही शिंदे म्हणाले.
हेही वाचा -