नवी दिल्ली The Tale of Two Bails : मनी लाँड्रींगच्या घोटाळ्यात 2024 या वर्षी दोन मुख्यमंत्र्यांना कारागृहात जावं लागलं. यात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. भारतीय सैन्य दलाच्या मालकीची जमीन कथितरित्या विक्री आणि खरेदीमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. तर दिल्ली दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला अटक करण्यात आली. यात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अटक होण्यापूर्वी 31 जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला. दुसरीकडं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करुनही त्यांनी पदावर कायम राहणं पसंत केलं. या दोन्ही प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांनी न्यायालयाकडं निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मागितला. मात्र केवळ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यात आला. तर हेमंत सोरेन अजूनही कारागृहात आहेत.
निवडणूक प्रचारासाठी मागितला अंतरिम जामीन : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात अटक करण्यात आली होती. यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारु घोटाळ्यात अटक केल्यानंतर त्यांना तिहार कारागृहात ठेवण्यात आलं. तर हेमंत सोरेन यांना भारतीय सैन्य दलाची जमीन खरेदी विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलं. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक 2024 साठी या दोघांनीही न्यायालयाकडं अंतरिम जामीन मिळण्यासाठी विनंती केली होती. मात्र न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला. तर हेमंत सोरेन यांना अद्यापही जामीन देण्यात आला नाही.
कशामुळे झाली अरविंद केजरीवाल यांची सुटका - सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं अरविंद केजरीवाल यांची 10 मे रोजी अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन दिल्यानं अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. राऊस अव्हेन्यू न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयावर ठाम राहत दिल्ली उच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर शिक्कामोर्तब केलं. त्याविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिल्यानं लोकसभा निवडणूक 2024 प्रचंड गाजली. "लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या वर्षातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. जामीन देताना एखाद्या व्यक्तीशी संबंधित वैशिष्ठ्ये विचारात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या परिस्थितीची तुलना करता येणार नाही," असं न्यायालयानं नमूद केलं.
कशामुळे थांबली हेमंत सोरेन यांची सुटका - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायलयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. मात्र झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अद्यापही जामीन मंजूर करण्यात आला नाही. झारखंडमधील तीन मतदार संघात 20 तारखेला लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान होत आहे. मात्र पाचव्या टप्प्यासाठी होत असलेल्या या मतदानाला हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर करण्यात आला नाही. त्यांना जामीन नाकारण्याचं कोणतीह सरळ कारण अद्याप देण्यात आलं नाही.
अरविंद केजरीवाल यांच्या खटल्यातील वस्तुस्थिती आणि त्यांच्या जामीन आदेशात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला युक्तिवाद स्पष्ट झाला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांनी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चा आणि राज्यामध्ये त्यांचं महत्त्व पाहता हेमंत सोरेन यांनीही जामिनासाठी अर्ज करण्याची गरज होती. हेमंत सोरेन यांनी जामिनासाठी अर्ज केला असल्यानं त्यावर आज सुनावणी पार पडणार आहे. हेमंत सोरेन यांच्या जामीन अर्जावर 20 मे रोजी सुनावणी घेण्याचा खंडपीठाचा हेतू होता. मात्र सोरेन यांच्या वकिलांनी आग्रह धरल्यानं खंडपीठानं 17 मे रोजी सुनावणी ठेवली आहे. सोरेन यांच्या वकिलांनी अगोदरच उच्च न्यायालयात झालेल्या विलंबाचं कारण देत सुनावणी लवकर घेण्याचा आग्रह केला. या अगोदर हेमंत सोरेन यांची 3 मे रोजी जामिनासाठीची याचिका फेटाळण्यात आली होती.