हैदराबाद Renewable Energy Sector : श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हे मागील वर्षी जुलैमध्ये भारत भेटीवर आले होते. यावेळी त्यांनी भारत श्रीलंका आर्थिक भागीदारी करार केला. भारत श्रीलंकेत झालेल्या या करारानंतर भारतीय कंपन्या हिंदी महासागरात अक्षय ऊर्जा क्षमता वाढवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे श्रीलंकेत अक्षय ऊर्जा निर्मितीत भारतीय कंपन्या अग्रेसर असल्याचं स्पष्ट होत आहे.
बेटांवर हायब्रिड रिन्युएबल एनर्जी सिस्टम्स : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये अक्षय ऊर्जा निर्मितीबाबत करार करण्यात आला आहे. यात या महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीलंका अक्षय ऊर्जा प्राधिकरण, श्रीलंका सरकार आणि बंगळुरूतील यू सोलर क्लिन एनर्जी सोल्युशन ( U Solar Clean Energy Solutions ) यांनी हा करार केला आहे. या करारानुसार डेल्फ्ट या जाफनाच्या किनाऱ्याजवळील उपसागरात असलेल्या ( Neduntheevu ), Nainativu आणि Analaytivu या बेटांवर हायब्रिड रिन्युएबल एनर्जी सिस्टम्स बसवण्यासाठी हा करार केला आहे.
तीन बेटांवर अक्षय वीज निर्मिती प्रकल्प : श्रीलंकेत करण्यात येणाऱ्या अक्षय वीज निर्मिती प्रकल्पात भारत सरकार अनुदान देणार आहे. याबाबत कोलंबो इथल्या भारतीय उच्चायुक्तांनी एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात त्यांनी ( Neduntheevu ), Nainativu आणि Analaytivu या तीन बेटांवरील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकार प्रकल्पासाठी निधी देणार आहे. हा प्रकल्प सौर ऊर्जा आणि पवन उर्जा या दोन्ही ऊर्जावर आधारित असणार आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे.
भारत सरकार देणार 11 दशलक्ष डॉलर : भारत सरकार श्रीलंका यांच्यात करण्यात आलेल्या करारानुसार अक्षय ऊर्जा निर्मितीत तीन बेटांवर हा प्रकल्प राबवणार आहे. यात कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसलेल्या या बेटावर राहणाऱ्या नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी अक्षय ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी 2 हजार 230 किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प करणार आहे. त्यासाठी भारत सरकार 11 दशलक्ष डॉलरचं अनुदान देणार आहे. भारत सरकारच्या या अनुदानातून या तीन बेटांवर अक्षय ऊर्जा निर्मिती केल्यानं नागरिकांना फायदा होण्याची शक्यता आहे.
गंभीर आर्थिक संकटातून जाणाऱ्या श्रीलंकेला भारताची मदत : श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे श्रीलंकेतील आर्थिक संकटात भारत मदत करत आहे. भारत आणि श्रीलंकेत झालेल्या अक्षय ऊर्जा प्रकल्प करारांतर्गत तीन बेटांवर अक्षय ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. या बेटांवरील नागरिकांचा या निर्मिती प्रकल्पांमुळे मोठा कायापालट होणार आहे. याबाबत मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड असोसिएटचे फेलो आनंद कुमार यांनी "मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला भारत मदत करत आहे," असं नमूद केलं आहे.
चीनी कंपनीला मिळालं होतं कंत्राट : हिंदी महासागरातील तीन बेटांवर भारत सरकारच्या अनुदानातून अक्षय वीज प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांचं कंत्राट जानेवारी 2021 मध्ये चीनी कंपनीला मिळालं होतं. आशियाई विकास बँकेनं ( ADB ) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ही बोली प्रक्रिया पार पडली होती. मात्र भारतानं सुरक्षेबाबतची चिंता व्यक्त केली होती. श्रीलंकेतील ही बेटं भारताच्या दक्षिणेकडील किनारपट्टीपासून फक्त 50 किमीवर आहेत. त्यामुळे ही चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे श्रीलंकेनं हे कंत्राट चीनी कंपनीकडून काढून घेतलं. त्यानंतर हे कंत्राट U Solar Clean Energy Solutions या बंगळुरूच्या कंपनीला देण्यात आलं आहे.
हेही वाचा :