नवी दिल्ली US Strike Iraq Syria : जॉर्डनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना अमेरिकेनं शुक्रवारी सीरिया आणि इराकमधील 85 ठिकाणांवर जोरदार बॉम्बहल्ले केले. अमेरिकेच्या सैन्यानं इराणच्या कुड्स फोर्सला लक्ष्य केलं. सैन्यानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. सीरियातील मीडियानुसार, या हल्ल्यांमध्ये 18 इराण समर्थित दहशतवादी ठार झाले आहेत.
तीन अमेरिकन सैनिक ठार झाले होते : गेल्या रविवारी जॉर्डनमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार तर 40 हून अधिक जण जखमी झाले होते. अमेरिकन सैन्यानं सांगितलं की, शुक्रवारी अमेरिकेनं इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) आणि इराक आणि सीरियामधील त्यांच्या समर्थित मिलिशियाच्या 85 हून अधिक लक्ष्यांवर प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये सीरियातील चार आणि इराकमधील तीन अशा 7 ठिकाणी 85 हून अधिक लक्ष्यांना टारगेट करण्यात आलं.
जो बायडेन यांचं निवेदन : अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी एक निवेदन जारी केलं की, "ही फक्त सुरुवात होती आणि त्यानंतर आणखी स्ट्राइक होतील. अमेरिकेला मध्यपूर्वेमध्ये किंवा जगात कोठेही संघर्ष नको आहे. परंतु हे लक्षात ठेवा, जर तुम्ही अमेरिकेला हानी पोहोचवली तर आम्ही प्रत्युत्तर देऊ." आता या स्ट्राइकचा एकूण परिणाम काय होईल हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, जो बायडन यांनी इराणच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या अमेरिकन सैनिकांच्या कुटुंबियांशी भेट घेऊन श्रद्धांजली वाहिली आहे. जॉर्डनमध्ये इराण-समर्थित अतिरेक्यांनी अमेरिकन सैनिकांना ठार केल्यानंतर जो बायडन यांच्यावर इराणवर हल्ला करण्याचा दबाव होता.
सर्व हल्ले यशस्वी : यूएस जॉइंट स्टाफचे डायरेक्टर, लेफ्टनंट जनरल डग्लस सिम्स यांनी सांगितलं की, "सर्व हल्ले यशस्वी झाल्याचं दिसून आलं. मात्र, कोणता दहशतवादी मारला गेला की नाही हे स्पष्ट झालेलं नाही." सीरियन माध्यमांनी शुक्रवारी सांगितलं की, सीरियन-इराकी सीमेवर झालेल्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत.
हे वाचलंत का :