नवी दिल्ली Ram Mandir Pakistan : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पाकिस्ताननं निषेध केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं की, हा सोहळा भारताच्या वाढत्या बहुसंख्यवादाचं सूचक आहे. तसेच, 'अतिरेकींच्या जमावानं' बाबरी मशीद पाडली, असंही मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलंय.
निवेदनात काय म्हटलंय : "खेदजनकपणे, भारताच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेनं या घृणास्पद कृत्यासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना केवळ निर्दोष सोडलं नाही तर पाडलेल्या मशिदीच्या जागेवर मंदिर बांधण्याचीही परवानगी दिली. गेल्या 31 वर्षातील घडामोडी ह्या भारतातील वाढत्या बहुसंख्यवादाचं सूचक आहेत", असं या निवेदनात म्हटलंय. तसेच हा भारताच्या लोकशाहीवरील डाग असल्याचा दावाही पाकिस्ताननं केला.
भारतात वाढता इस्लामोफोबिया : "वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील शाही ईदगाह मशिदीसह अशा मशिदींची संख्या वाढत आहे, ज्यांच्या अस्तित्वावर संकट निर्माण झालंय. भारतातील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या वाढत्या प्रभावामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात येऊ शकते. आंतरराष्ट्रीय समुदायानं याला 'वाढता इस्लामोफोबिया' म्हटलंय. याची दखल घेतली पाहिजे, असंही या निवेदनात नमूद आहे.
सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली : भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं 2019 मध्ये निकाल दिला की, अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जागेवर हिंदू मंदिराचं अस्तित्व सिद्ध करणारे पुरावे आहेत. यानंतर न्यायालयानं वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्यास परवानगी दिली. तसेच भव्य मशिदीच्या बांधकामासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा : 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याला हजारो मान्यवर उपस्थित होते. याशिवाय, अनेक राजकारणी, अभिनेते आणि क्रीडा स्टार्सनं अयोध्येला भेट दिली आणि नव्यानं बांधलेल्या मंदिरात रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भाग घेतला.
हे वाचलंत का :