इस्लामाबाद : पाकिस्तानातील क्वेटा येथे सोमवारी काही हल्लेखोरांनी 31 जणांची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये काही लोकांनी हे कृत्य केले. क्वेटामध्येही काही ठिकाणी गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी अयुब अचकझाई यांनी सांगितलं की, बलुचिस्तान प्रांतातील मुसाखैल जिल्ह्यात बस थांबवून त्यातील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यामधील 23 जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. अशाच प्रकारची एक घटना याआधीही झाली होती. बलुचिस्तानच्या कलात जिल्ह्यात बंदूकधाऱ्यांनी चार पोलीस अधिकारी आणि पाच पादचाऱ्यांसह किमान नऊ जणांना ठार केले होते.
हल्लेखोरांनी जातीच्या आधारावर हल्ला केल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. हल्ला झालेले ते सर्व लोक कोणत्या ना कोणत्या वाहनातून प्रवास करत होते. वाटेत अडवून त्याची हत्या करण्यात आली. बलुचिस्तानच्या मुसाखैल जिल्ह्यातील एक वरिष्ठ अधिकारी नजीबुल्लाह काकर यांनी स्थानिक वृत्तसंस्थेला सांगितलं की, "पंजाबला बलुचिस्तानशी जोडणाऱ्या महामार्गावर हा गोळीबार करण्यात आला. बस, ट्रक आणि व्हॅन थांबवून त्यातील नागरिकांना बाहेर काढून नंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला."
एएफपीने पोलीस अधिकारी अयुब अचकझाईच्या हवाल्याने सांगितले की, हल्लेखोरांनी किमान 10 वाहने जाळली. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी ही घटना निंदनीय असल्याचे म्हटले आहे. या घटनेतील पीडित असणाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे झरदारी यांनी सांगितले.