हैदराबाद Right Way To Eat Figs : अंजीर खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. अंजीरला सुपर फूड म्हणून देखील ओळखलं जातं. यामुळे शरीराला मॅंगनीज, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, कॅल्शियम, पोटॅशियम आणि झिंक अशी खनिजं मिळतात. तसंच अंजीरमध्ये फायबर आणि अॅंटिऑक्सिडंट अधिक प्रमाणात असते. अंजीर खाल्ल्यानं मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास देखील कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील अंजीर उपयुक्त आहे. तसंच मधुमेहाच्या रुग्णांना देखील याचा फायदा होतो.
अंजीर खाण्याचे फायदे
उच्च रक्तदाब नियंत्रित करते : अंजीरमध्ये आढळणारा पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल त्यांनी आहारात अंजीरचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
पचनसंस्था निरोगी ठेवते : बद्धकोष्ठतेच्या समस्येनं त्रस्त लोकांसाठी अंजीर एक प्रभावी स्रोत आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे आतड्याची हालचाल सुरळीत होते आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय अंजीर पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासही मदत करते.
मधुमेहींसाठी फायदेशीर : मधुमेही रुग्णांच्या आहारात अंजीरचा समावेश करणं चांगलं आहे. अंजीर खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी कमी होते. यामध्ये आढळणारे ऍब्सिसिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि क्लोरोजेनिक ऍसिड सारखी संयुगे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
त्वचेसाठी फायदेशीर : अंजीरमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं. यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते. अंजीर खाल्ल्यानं त्वचेचं पोषण होतं.
हाडांसाठी फायदेशीर : अंजीर खाणं हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांच्या विकासासाठी मदत करतात.
रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा वाढते : आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. नहुष कुंटे यांच्या मते, अंजीरच्या पाण्यात जीवनसत्त्व ए, बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, मँगनीज आणि लोह यासह अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. एकूणच आरोग्यासाठी हे पोषक घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. अंजीर रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा वाढवण्यासाठी देखील केला जातो.
अंजीर खाण्याची योग्य पद्धत? - अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही ते कोरडेही खाऊ शकता. परंतु अंजीर रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी त्याचं सेवन केल्यास जास्त फायदा होतो. तुम्ही दुधातही अंजीर भिजवून ठेवू शकता. दिवसातून जास्तीत जास्त 3 ते 4 अंजीर खावीत. जास्त खावू नये.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)