हैदराबाद Earn Money By Sleeping : काहीच काम न करता कुणी आपल्याला पैसे दिले तर किती बरं होईल ना, असा विचार आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाच्याच मनात येतो. मात्र, पैसे मिळवणं इतकं सोपं नसतं, त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. पण जर आम्ही तुम्हाला एका अशा नोकरीबद्दल सांगितलं ज्यात तुम्हाला फक्त झोपेसाठी 10 लाख रुपये मिळू शकतात, तर कदाचित तुम्हाला विश्वास वाटणार नाही. मात्र, बंगळुरूची कंपनी असा एक अनोखा इंटर्नशिप प्रोग्राम घेऊन आली आहे. लोकांना झोपण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत.
बंगळुरूमधील 'स्लीप अँड हाऊस सॉल्युशन कंपनी वेकफिट' दरवर्षी असा एक प्रोग्राम आयोजित करते. यामध्ये लोकांना चांगली झोप घेण्यासाठी नियुक्त केलं जातं. त्याबदल्यात तब्बल दहा लाख रुपये वेतन दिले जाते. या कंपनीकडून एक स्लीप इंटर्नशिप प्रोग्राम आयोजित केला जातो. त्यामध्ये निवड झालेल्या स्लीप इंटर्न्सना लाखो रुपये कमावण्याची संधी दिली जाते.
असं असणार काम : या स्लीप इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळवण्यासाठी तुम्हाला सलग 60 रात्री दररोज 9 तास गाढ झोप घ्यावी लागेल. स्पर्धकांना दररोज वेळेवर येऊन झोपावं लागेल. झोपण्यासाठी वेकफिटची गादी आणि एक उत्तम स्लीप ट्रॅकर दिला जाईल. तुमच्या झोपेचे कंपनीकडून निरीक्षण केलं जाईल. विशेष म्हणजे ही झोप गाढ असली पाहिजे. त्यासाठी कंपनीकडून सर्व सुविधा दिल्या जातील.
- कसा करायचा अर्ज? : तुम्ही वेकफिटच्या वेबसाइटवर जाऊन या जॉबसाठी अर्ज करू शकता. यामध्ये आपल्याला आपली वैयक्तिक माहिती अर्जात भरुन तो अर्ज सबमिट करावा लागेल. वेकफिट ही एक गादी, उशा किंवा इतर झोपेच्या संबंधित उत्पादनं बनविणारी कंपनी आहे. त्यामुळं या इंटर्नशिप प्रोग्राममागे एक मार्केटिंग स्टंटदेखील असू शकतो असं म्हटलं जातंय.
बंगळुरूच्या तरुणीनं जिंकले 9 लाख रुपये : बंगळुरू येथील साईश्वरी पाटील नावाच्या तरुणीनं नुकतेच या इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत 9 लाख रुपये कमावले आहेत. साईश्वरी पाटील व्यवसायानं बँकर असून वेकफिटच्या स्लीप इंटर्नशिप प्रोग्रामच्या तिसऱ्या सिजनमध्ये तिनं भाग घेतला होता. साईश्वरी 12 निवडक स्लीप इंटर्नपैकी एक होती. दिवसभरात 20 मिनिटे चांगली डुलकी घेणे, हा देखील या प्रोग्रामचा एक भाग असल्याचं साईश्वरीनं सांगितलं.
हेही वाचा -