मुंबई Organ Donation Awareness : रक्तदान, नेत्रदान हे सर्वात मोठं आणि श्रेष्ठदान समजलं जातं. परंतु, याहीपुढे जाऊन शरीरातील इतर अवयवांचं दानसुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मात्र, आपल्या देशात मृत्यूनंतर अवयव दान करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. अवयवदानासंदर्भात समाजात जागरुकता निर्माण व्हावी यासाठी मुंबईतील भांडुप येथे राहणाऱ्या राजोल पाटील या तरुणीनं पुढाकार घेतलाय. राजोल पाटील गेल्या चार-पाच वर्षांपासून अवयवादानाचं महत्व पटवून देण्याचं मोठं आणि श्रेष्ठ काम आपल्या 'जीवनदान' या संस्थेच्या माध्यमातून करत आहे.
स्वत:पासून सुरुवात : राजोल पाटीलनं अवयवदानाच्या जनजागृतीची सुरुवात स्वत:पासून केली. सर्वप्रथम तिने आपला आणि आपल्या आई-वडिलांचा अवयवदानाचा फॉर्म भरून त्याची अधिकृत नोंद केली. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना राजोल पाटील म्हणाली, "अवयवदान केल्यामुळं आपला पुनर्जन्म होत नाही असं अजूनही अनेकांना वाटतं. मात्र, ही सर्व अंधश्रद्धा आहे. आपल्या शरीरातील काही अवयव जर कोणाच्या कामी येत असतील तर यासारखं कोणतं पुण्य नाही. त्यामुळं अवयवदानासाठी लोकांनी पुढं येणं गरजेचं आहे."
शरीरातील कोणत्या अवयवांचं दान केलं जातं : "अवयवदान करण्यासाठी सर्वप्रथम त्यासंदर्भात एक फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर अवयवदान केलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ठराविक मुदतीत त्याचे अवयव घेण्यात येतात. त्यानंतर गरजू रुग्णांना ते अवयव दान केले जातात. यामध्ये प्रामुख्यानं नेत्रदान, फुफ्फुस, किडनी आदी अवयवांचं दान करण्यात येतं", असं राजोल पाटीलनं सांगितलं.
हेही वाचा -