मुंबई - National Broadcasting Day 2024: राष्ट्रीय प्रसारण दिवस देशात दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1927 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (IBC) ची स्थापना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात आयोजित रेडिओ प्रसारणाच्या जन्माचे स्मरण करून देतो. भारतातील प्रसारणाचा इतिहास 20 व्या शतकाच्या सुरुवातीचा आहे. 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (IBC) नं बॉम्बे स्टेशनवरून पहिले अधिकृत रेडिओ प्रसारण केलं होतं. यानंतर भारतात रेडिओ प्रसारणाचा जन्म झाला. बातम्या, संगीत आणि मनोरंजनासाठी रेडिओनं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं.
राष्ट्रीय प्रसारण दिवस : 1930 मध्ये भारतीय प्रसारण सेवा (ISBS) ची स्थापना करण्यात आली याशिवाय 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ (AIR) असं नाव देण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी हे राष्ट्र उभारणीचं एक महत्त्वाचं साधन बनलं. अनेक ठिकाणी प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यात आली. यानंतर देशात आकाशवाणीचा प्रसार झाला. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, त्यामुळे सांस्कृतिक आणि भाषिक विविधता पाहून वेगवेगळी केंद्र स्थापन करण्यात आली. 1957 मध्ये सुरू झालेला 'विविध भारती' हा सर्वात प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक होता. या कार्यक्रमानं संगीत, नाटक आणि लोकप्रिय संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवले.
रेडिओनं केलं जनजागृतीचं काम : रेडिओ हे सर्वात जुने, सर्वाधिक लोकप्रिय माध्यमांपैकी एक राहिले आहे. स्वातंत्र्यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद रेडिओ आणि काँग्रेस रेडिओनं भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध जागृत करण्याचे काम केले होते. रेडिओ प्रसारणानं स्वतंत्र भारताच्या उभारणीत उत्तम योगदान दिलंय. नैसर्गिक आपत्तींच्या काळात माहिती पुरवण्यातही प्रसारण महत्त्वाची भूमिका बजावते. रेडिओ आणि टेलिव्हिजननं भारतातील विविधतेची फक्त माहिती दिली नाही तर जनतेला योग्य माहिती देऊन जागृत करण्याचं देखील काम केलं आहे. आजही काही गावांमध्ये शेतकरी रेडिओ घेऊन शेतातजातो आणि शेतीमधील काम करताना दिसतो. आता डिजिटल युगाची सुरुवात झाली असल्यामुळं रेडिओ कमी प्रमाणात ऐकला जातो.