Winter Health Care Tips: सहसा नोव्हेंबरमध्ये हवामान बदलू लागते आणि हिवाळ्याची सुरुवात होते. तसंच नोव्हेंबरच्या अखेरीस थंडी वाढू लागते. हवामान बदलामुळे या काळात विविध आजारांनाही समोरे जावं लागते. कारण हिवाळ्यात बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव जास्त असतो. अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार हिवाळ्याच्या गारव्यामुळे शरीराचे तापमान कमी होते. अशा वेळी नवीन हवामानाशी जुळवून घेण्याकरिता शरीराचे योग्य तापमान राखणे महत्त्वाचे आहे. खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही आजारापासून दूर राहू शकता आणि थंडीचा बिनधास्त आनंद लुटू शकता.
- व्यायाम: हिवाळ्यात स्वतःला निरोगी ठेवण्याकरिता शारीरिक हालचाली करणे गरजेचं आहे. योगासन, चालणे, धावणे आणि इतर व्यायाम करून तुम्ही तुमचे शरीर उबदार ठेवू शकता. यामुळे सर्दी, फ्लू तसंच इतर हंगामी आजारांपासून तुमचं संरक्षण होईल. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होईल.
- आरोग्यदायी पदार्थ: संपूर्ण धान्य, मांस, मासे, शेंगा, सुकामेवा, बीन्स, मसाले, ताजी फळे आणि पालेभाज्या खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले अन्न देखील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास फायदेशीर आहेत.
- पाणी प्या: हिवाळ्यामध्ये बहुतांश लोक पुरेशा प्रमाणात पाणी पित नाहीत. परंतु उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यात देखील स्वतःला हायड्रेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते. यामुळे आपण निरोगी राहतो. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला निरोगी राहायचं असल्यास तुम्ही दिवसातून किमान दोन लिटर पाणी पिणं गरजेचं आहे.
- मॉइश्चरायझर: हिवाळ्यामधील थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचा ड्राय होते. कारण गारव्यामुळे शरीरातून पाहिजे त्या प्रमाणात घाम निघत नाही. परिणामी त्वचा खरखरीत आणि कोरडी पडते. यामुळे खाज सुटणे, ओठ फाटणे तसंच पायाला भेगा पडणे कॉमन आहे. अशा वेळी त्वचेला मॉइश्चरायझर लावणे अत्यंत आवश्यक आहे.
संदर्भ
https://magazine.medlineplus.gov/article/cold-weather-wellness-tips-for-staying-healthy-this-season
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)