Psychiatric Help Family Conflicts: सासू-सुनेचं नातं हे जगावेगळं असतं. असं म्हटलं जातं की ते आई-मुलीसारखं असावं. मात्र, बहुतांश घरी सासू सुनेमध्ये खटके उडतात. यात गंमत अशी की या दोघींच्या भांडणात नवऱ्याचं भरीत होतं. पत्नीला वाटतं की नवरा मला महत्व देत नाही, केवळ आपल्या आईचं ऐकतो. तर, आईला वाटतं की, लग्नानंतर मुलगा आपल्या हातात राहिलेला नाही. या सर्वांमुळं नवरा बायकोमध्ये चांगलं नातं असलं तरी काही वेळेस वाद होतात. सुनेला चांगल्यानं नांदावंस वाटलं तरी या भांडणांना वेगळं स्वरूप येतं. अनेकदा ते विकोपाला जातात. त्यातून ताटातुटीची वेळ येते आणि अनेक कुटुंब उध्द्वस्त होतात. सध्या घराघरात हा कल्लोळ सुरू आहे. मात्र, काही गोष्टींवर लक्ष दिलं तर अशा घटना टाळता येऊ शकतात. ते कसं? जाणून घेऊयात.
नवरा-बायको म्हटलं की तू-तू मैं-मैं होणारंच. कारणं छोटी असो वा मोठी ती वाद घडवू शकतात. ते त्यावेळची परिस्थिती, दोघांची मानसिकता, शारीरिकता, सभोवतालचं वातावरण यावर अवलंबून असतं. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. मंदादी गोवरीदेवी यांच्या रुग्णालयात आलेलं एक जोडपं अशाच समस्येत अडकलं होतं. त्यांचं लग्न होऊन वर्ष झालेलं आहे. पत्नीला वाटतं की नवरा आई आणि त्याच्या मोठ्या बहिणीचं जास्त ऐकतो. आवडत नसतानाही तिला नवऱ्याच्या सर्व गोष्टी मान्य कराव्या लागतात. नवरा आणि बायकोच्या व्यवहारात त्यांचं काम काय? असा हस्तक्षेप तिला आवडत नाही. त्यावर समाधान मिळावं म्हणून त्यांनी मानसशास्त्रज्ञाची मदत घेतली आहे.
- वाद का होतात? लग्नापूर्वी प्रत्येक मुलगी नवरा, मुलं आणि सासरच्या कुटुंबाबात अनेक स्वप्न रंगवत असते. लग्नापूर्वी मैत्रिणींसोबत किंवा जवळच्या नातलगांसोबत सासू या व्यक्तीबाबत बरीच चर्चा झालेली असते. आधीच लग्न झालेल्या मुली आपल्या सासूच्या चहाड्या करतात. नको ते फुकटचे उपदेश देतात. लग्नानंतर मुलगी आपलं माहेर सोडून सासरी येते. त्यावेळी ती पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून असते. नवरासुद्धा या नवीन अनुभवांमुळं आपल्या आई-बहिणींवर अवलंबून असतो. यामुळं आपला जोडीदार आपल्याला प्राधान्य देत नाही ही भावना हळूहळू मनात तयार व्हायला लागते. त्यामुळं भांडणं होतात. मात्र, भांडणामुळं नातं टिकत नाही.
- हे समजून घ्या: प्रत्येक मुलगा जन्मापासूनच आई-वडिलांसोबत असल्यामुळे कोणत्याही गोष्टींबाबत निर्णय घेताना त्यांची परवानगी घेण्याची त्याला सवय असते. हे त्याच्यासाठी सामान्य असतं. मात्र, बायको म्हणून आपल्या अपेक्षा वेगळ्या असतात. नवऱ्याची ही सवय स्विकारण्यास आपण असमर्थ ठरतो. त्यामुळं मनात राग आणि चिडचिड होते. ज्याचं रूपांतर भांडणात होतं, असं डॉ. मंदादी यांचं म्हणणं आहे.
काय करावं?
- प्रेमळ व्हा: तुम्हाला सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर सर्वप्रथम नवरा बायकोनं एकमेकांवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही एकमेकांना वेळ द्या. जुन्या सवयीमुळं नवऱ्याला बायकोचं म्हणणं समजायला वेळ लागू शकतो. अचानक आई-बहिणीचं सोडून तुमचं ऐकताना त्याला थोडं अॅडजस्ट करावं लागतं. ही बाब पत्नीम्हणून समजून घेणं फार आवश्यक आहे. चित्र पालटण्यासाठी जोडीदाराशी प्रेम वाढवा आणि आपल्याप्रती आपुलकी निर्माण करा.
- थांबा आणि बघा: तुमच्या नवऱ्याला पटवून द्या की तुम्हालाही ते आपलं कुटुंब आहे असं वाटतं. तुम्ही हे केले तर भविष्यात तुमचा नवरा तुम्हाला इतरांपेक्षा जास्त महत्त्व देईल. कौटुंबिक चर्चेत सहभागी व्हा. एखाद्याचं म्हणणं तुम्हाला आवडत नसेल तरी ते स्विकारा. नवऱ्याला फक्त आई-बहिणींच्याच गोष्टी श्रेष्ट वाटतात, अशी वारंवार तक्रार करू नका. त्यामुळं तुम्हाला नकारात्मक विचार करायला येतील. काही काळ तुम्ही नवऱ्याला स्पेस दिली तर भविष्यात तुमच्यावरचा विश्वास वाढेल आणि पतिमध्ये नक्की बदल दिसतील. त्यामुळे धीराने वाट पहा, असा सल्ला मंदादी गौरीदेवी यांनी दिला.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)