हैदराबाद Bleeding Gums Causes : अनेकांना ब्रश किंवा फ्लॉस करताना हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव होतो. ब्रिस्टल्स खूप कठीण असल्यामुळे किंवा हिरड्यांना दुखापत झाल्यास रक्तस्राव होऊ शकतो. हिरड्यामधून रक्तस्त्राव होण्यामागं या ऐवजी इतरही कारणं असू शकतात. तुम्ही सुद्धा याच समस्येचा सामना करत आहात का? असं असल्यास सतर्कता बाळगावी, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास भविष्यात आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची कारणं काय आहेत? तसंच या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी?
वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची अनेक कारणं आहेत. विशेषतः, दात व्यवस्थित साफ न केल्यामुळे हळूहळू दातांवर प्लेकचा थर तयार होतो आणि ते कठोर बनतात, ज्यामुळे संवेदनशील हिरड्यांचे नुकसान होते. परिणामी रक्तस्त्रावाची समस्या उद्भवते.
गंभीर आजार होण्याची शक्यता : हिरड्यांचं संक्रमण दीर्घकाळ राहिल्यास हिरड्यांना आधार देणारी जबड्याची हाडं देखील खराब होण्याची शक्यता असते. यालाच हिरड्यांना आलेली सूज असं म्हणतात. ही समस्या अद्भवल्यास लोकांना ब्रश करताना रक्तस्त्राव होऊ शकतो. जर संसर्ग अधिक गंभीर असेल तर त्याला पीरियडॉन्टल रोग म्हणतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल अँड क्रॅनिओफेशियल रिसर्च रिपोर्टनुसार या आजारामुळे हिरड्यांमध्ये अल्सर तयार होण्याची शक्याता जास्त असते तसंच दात देखील गळू शकतात.
धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हिरड्यांच्या आजाराचा धोका जास्त: धूम्रपान करणाऱ्यांना हिरड्यांच्या आजार होण्याचा धोका दुप्पट असतो असं म्हटलं जातं. जर्नल ऑफ पीरियडॉन्टोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हिरड्यांच्या आजाराचा धोका जास्त असतो असं स्पष्ट झालं आहे. या संशोधनात स्पेनमधील युनिव्हर्सिडेड कॉम्पुटेन्स डी माद्रिद येथील पीरियडॉन्टोलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ. मिगुएल एंजल स्लाविन्स्की यांनी अभ्यास केला.
मधुमेह आणि गर्भधारणे दरम्यान जास्त संभावना: याशिवाय मधुमेह, व्हिटॅमीन केची कमतरता, गर्भधारणेदरम्यान होणारे हार्मोनल बदल, ल्युकेमिया, तणाव, एचआयव्ही/एड्समुळे देखील हिरड्यांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे, तुमच्या हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार घेणं चांगलं.
ही खबरदारी घेणे आवश्यक
विशेषतः तोंड स्वच्छ ठेवावं. त्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करा.
हार्ड ब्रश वापरण्यापेक्षा मऊ ब्रश वापरावा. त्याचप्रमाणे योग्य टूथपेस्ट निवडा.
तसंच दातांमधील प्लेक काढण्यासाठी नियमितपणे फ्लॉसिंग करावं.
दात मजबूत करण्यासाठी संतुलित आहार घेतला पाहिजे. सिगारेट, तंबाखू यासारख्या सवयी शक्यतो टाळाव्यात.
चेक-अप आणि साफसफाईसाठी नियमितपणे दंतवैद्याला भेट द्या. तज्ञांचं म्हणणं आहे की, या गोष्टींचं नियमित पालन केल्यानं तुम्ही हिरड्यांमधून रक्त स्त्राव होण्याच्या समस्येपासून सुटका करु शकता.
अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.nidcr.nih.gov/health-info/gum-disease
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)