Home Remedies For Cracked Heels: हिवाळ्याच्या गारव्यामुळे अंग कोरडं होणे आणि टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे. टाचांना भेगा पडल्यामुळे सॅंडल घालताना अस्वस्थ वाटते. तसच कधी-कधी त्यातून रक्तस्त्राव होतो. ही समस्या दूर करण्यासाठी आपण विविध उपाय करतो. त्यापैकी एक म्हणजे नियमित मॉइश्चराइझर आणि बॉडी लोशनचा वापर. परंतु, भेगा काही केल्या जात नाही. या भेगा पडलेल्या टाचांमध्ये असाह्य वेदना देखील होतात. वेळीच या समस्येवर उपाय न केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकते. चला तर जाणून घेऊया टाचांना भेगा पडू नये यासाठी काय करावं. तसंच भेगा पडलेल्या पायांवर काय उपाय करावा.
ग्लिसरीन आणि कोरफड जेल: एक वाटी घ्या. त्यात एक चमचा ग्लिसरीन आणि कोरफड जेल टाका आणि चांगलं मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर ती बाजूला ठेवा. आता कोमट पाण्यानं पाय स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टाचांवर तयार केलेली कोरफड आणि ग्लिसरीनची पेस्ट लावा. यामुळे टाचांवर ओलावा टिकून राहिल तसंच टाच चांगल्या राहण्यास मदत होईल.
मॉइश्चरायझर: झोपण्यापूर्वी 20 मिनिटे कोमट पाण्यात पाय भिजत ठेवा. त्यानंतर ब्रशच्या सहाय्यानं टाचा स्वच्छ करा. हे झाल्यानंतर टाचांवर मॉइश्चरायझर लावा आणि सॉफ्ट सॉक्स घाला. असं नियमित केल्यास तुम्हाला चांगला परिणाम जाणवेल. तसंच तुमच्या टाच स्वच्छ आणि सुंदर दिसू लागतील.
- मेण आणि खोबरेल तेल: एक बाऊल घ्या त्यात मेण टाका. यात 3 ते 4 टीस्पून खोबरेलत तेल, 1 टीस्पून पेट्रोलियम जेली तसंच एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सून घाला. आता एका पातील्यात पाणी गरम करा. त्या पाण्यात तयार केलेलं मिश्रण घाला आणि ते एकजीव करुन घ्या. सर्व मिश्रण वितळल्यानंतर त्यात 1 टीस्पून बेकिंग सोड घाला. मिश्रण वितळू द्या. आता तळ पाय धुवून कोरडं पुसून घ्या. तयार केलेलं मिश्रण हलकं थंड होवू द्या आणि ब्रशच्या सहाय्यानं टाचांवर लावा. 15 ते 20 मिनिटं झाल्यावर चमचा किंवा इतर साधनांचा वापर करून मिश्रण काढून घ्या. पाय स्वच्छ केल्यानंतर सॉक्स घाला. हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा. यामुळे खराब झालेल्या टाचा पुन्हा पिहल्यासारख्या दिसू लागतील.
- ऑलिव्ह ऑइल: भेगा दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल उत्तम आहे. यामुळे त्वचा मऊ आणि चांगली राहते. तुम्ही ऑलिव्ह ऑइलने टाचांवर 15 मिनिटं हळू हळू मसाज करा आणि काही तेल तसंच पायांवर राहू द्या. थोड्या वेळानं पायात सॉक्स घाला, असं केल्यास पायाची त्वचा सॉफ्ट राहते.
- जास्त पाणी प्या: शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास त्वचा कोरडी होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे तुम्ही दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. पाणी पिल्यास भेगांची समस्या देखील दूर होवू शकते. कारण त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी पाणी महत्त्वाची भूमिका बजावते.
- फुट क्रीम: शरीराची त्वचा नितळ राहण्यासाठी आपण मॉइश्चराइझरचा वापर करतो. अशाच प्रकारे टाचांची त्वचा चांगली राहावी म्हणून तुम्ही हायड्रेटिंग फुट क्रीमचा वापर करा. यामुळे त्वचेवरील ओलावा टिकून राहतो. तसंच चांगल्या परिणामासाठी झोपण्यापूर्वी पायावर फुट क्रीम लावा आणि सॉक्स घालून रहा.
डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)