हैदराबाद Exercises for Diabetes: मधुमेह सध्या अतिशय मोठी समस्या झाली आहे. मधुमेह एकादा जडला की, नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतात. मधुमेह ग्रस्त व्यक्तींना खाण्याबाबत अनेक पथ्य पाडावी लागतात. मधुमेह शरीरावर हळूवारपणे आघात करतो. यामुळे शारीरिक गुंतागुंत वाढते. निरोगी राहण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढली की, किडनी, हृदविकार अशा एक ना अनेक आजारांची लागण होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांसोबतच काही व्यायाम करणं उपयुक्त आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित व्यायाम केल्यास त्यांची साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.
पोहणे: पोहणे हा एक चांगला कार्डिओ व्यायाम आहे. यामुळे जलद गतीने कॅलरीज बर्न होतात. परिणामी वजन कमी होतं. तसंच पोहण्यामुळे स्नायू मजबूत होतात. यामुळे शरीर इन्सुलिनचा अधिक कार्यक्षमतेने वापर करते. पोहताना स्नायूंच्या ऊर्जेसाठी ग्लुकोजचा वापर होतो. तज्ज्ञांच्या मते, यामुळे रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी होते. म्हणून, मधुमेह असलेल्या लोकांसाठी पोहण्याची शिफारस केली जाते.
सायकलिंग: सायकल चालवताना आपले स्नायू जास्त काम करतात. स्नायूंना हालचाल करण्यासाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा मिळवण्यासाठी आपले शरीर रक्तातील ग्लुकोज वापरते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत मिळते. तज्ज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्या लोकांनी नियमित सायकल चालवल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.
'जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजी अँड मेटाबोलिझम' (जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजी अँड मेटाबॉलिझम) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार सायकलिंग टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे रक्तातील साखरेची प्रमाण नियंत्रित ठेवता येतं. ब्राझीलचे युनिव्हर्सिडेड फेडरल दो रिओ ग्रांडे दो सुल (UFRGS) डॉ. डॅनिएला ॲम्पियर यांनी हा अभ्यास केला आहे.
चालणे: मधुमेहींना संतुलित आहार घेण्यासोबतच दररोज किमान अर्धा तास चालणं महत्वाचं आहे. सकाळ किंवा संध्याकाळ ३० मिनिटं चालल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चालणे हा मोफत व्यायाम असल्यामुळे मधुमेही रुग्णांना दररोज चालण्याचा सल्ला दिला जातो.
जॉगिंग: डायबिटीजने त्रस्त लोकांनी जॉगिंग केल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्य राहू शकते. परंतु जॉगिंग करण्यापूर्वी मधुमेही रुग्णांनी वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
योग: मधुमेहानं त्रस्त असलेले लोक योगा करू शकतात. यामुळे ग्लुकोजची पातळी सामान्य होईल आणि तणाव कमी होईल. योगामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढण्यास मदत होते. तसंच रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ