शिर्डी Increase piles In Children : आजकाल पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुलांना देखील मूळव्याध हा आजार होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. मुलांमध्ये मूळव्याध वाढ होणं ही चिंताजनक बाब आहे. मोबाईलचं वाढतं व्यसन, त्यामुळे खेळण्याकडं होत असलेलं दुर्लक्ष, यामुळे मुलांमध्ये मूळव्याध हा आजार वाढत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सर्जनच्या वार्षिक परिषदेतील डॉक्टरांनी काढलाय.
पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुलांना मूळव्याध : आजकाल तरुण पिढी असो किंवा अगदी दीड वर्षाचं बालक, सगळेच सतत मोबाईल स्क्रिनवर अडकेलेले असतात. मात्र सतत मोबाईलमध्ये गुंतून राहिल्यानं लहान मुलांचं खेळण्यावर लक्ष राहिलं नाही. त्यात व्यायामाच्या अभावामुळे पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुलांना देखील मूळव्याधासारखे आजार होत असल्याचं समोर आलय.
शंभरपैकी पंधरा ते वीस मुलं मूळव्याधीनं ग्रस्त : महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सर्जनची वार्षिक परिषद नुकतीच पार पडली आहे. या परिषदेसाठी देशभरातील चौदाशेहून अधिक शल्यचिकित्सिक उपस्थित होते. शल्यचिकित्सकांच्या परिषदेतही या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. एकट्या शिर्डी परिसरातील मुळव्याधीवर उपचार करणाऱ्या एका रुग्णालयाची आकडेवारी बघितली, तर शंभरपैकी पंधरा ते वीस मुलं ही मूळव्याधीनं त्रस्त असल्याचं आढळल्याची माहिती सर्जन आणि मूळव्याध तज्ञ डॉ. किरण गोरे यांनी सांगितलं. "माझ्या रुग्णालयात दिवसाआड एक किंवा दोन रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या रुग्णाचं वय 8 ते 20 वर्ष गटातील आहे."
मुलांमध्ये वाढणारा मूळव्याध चिंताजनक : लहान मुलांमध्ये पोटदुखी, चिडचिड, मुळव्याध, फिशर सारखे वाढत जाणारे आजार ही पालकांच्या दृष्टीनं चिंताजनक बाब आहे. पालकांमध्ये याबाबतीत जागृती होणं गरजेचं आहे. मुलांना दिले जाणारे फास्टफूड हे देखील त्यामागचं कारण आहे. मुलं घरात असताना खेळत नाहीत. शाळेत गेल्यानंतर त्यांना मैदानी खेळाची सुविधा उपलब्ध असेलच असं नाही. मुलं सतत मोबाईल पाहात असतात. त्यामुळे या आजाराला मुलांना सामोरं जावं लागतं, असंही डॉ. किरण गोरे यांनी सांगितलं.
कोविड काळात मुलांना लागली मोबाईलची सवय : "कोविड काळात मुलांच्या हाती मोबाईल आला आणि ते त्याच्या अधिन झाले, त्याचा हा परिणाम आहे. त्यांना डब्यात फास्टफूड किंवा लवकर न पचणारे अन्नपदार्थ दिले जातात. गोड आणि तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्याची त्यांना चटक लागते. त्याचा परिणाम म्हणून वजन वाढतं, पचन मंदावतं आणि मूळव्याधीसारख्या आजारांना बालपणीच सामोरं जाण्याची वेळ येते. पूर्वी या आजाराचे रुग्ण संख्येनं कमी असत. लक्षणं दिसू लागली की पथ्य पाळण्यावर भर असे. आता तसं होताना दिसत नाही. गेल्या दहा वर्षांत तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत मूळव्याध, भगंदर आणि फिशर यासारख्या आजारात पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली. यामागं देखील हीच कारणं आहेत, ही चिंतेची बाब आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
आठवीत शिकणाऱ्या मुलाला मूळव्याध : "आठवीत शिकणारा राहाता तालुक्यातील एक मुलगा मूळव्याधीनं त्रस्त झाल्यानं पालक त्याला आपल्याकडं घेऊन आले. कोविडनंतर शाळेत लक्ष लागत नसल्यानं वेगवेगळी कारणं सांगून तो घरी थांबत होता. घरी थांबल्यानंतर मोबाईल हातातून सोडायला तो तयार नव्हता. मूळव्याधीच्या शस्त्रक्रियेनंतर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन त्याला मोबाईलपासून दूर करावं लागलं. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. पालकांनी या समस्येकडं गांभीर्यानं पहायला हवं," असंही डॉ किरण गोरे यांनी सांगितलं.
हेही वाचा :