मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान आज 20 नोव्हेंबर रोजी पार पडत आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान सुरु झालंय. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नागरिक मतदान करण्यासाठी घरातून बाहेर पडत आहे आणि आपला हक्क बजावत आहे. दरम्यान हक्क बजावण्यात चित्रपटसृष्टीतील स्टार्स कसे मागे राहतील. अभिनेता अक्षय कुमार, सुबोध भावे, फरहान अख्तर, रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया डिसूजा, उर्मिला मातोंडकर, सोनू सूद विशाल ददलानी, राजकुमार राव आणि सोनाली कुलकर्णी यासह अनेक सेलिब्रिटींनी मतदानं केलंय.
स्टार्सन बजावला मतदानाचा हक्क: मराठमोळा अभिनेता सुबोध भावेनं सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला. यानंतर त्यानं नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन देखील केलं. याशिवाय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं देखील मतदान करण्याचा नागरिकांना सल्ला देताना म्हटलं, "आपण सरकारला जाब तेव्हाच विचारु शकतो, जेव्हा आपण आपलं कर्तव्य बजावतो, त्यामुळे प्रत्येकानं मतदान करा. मतदान हे विचार करुन करा. यावेळी अत्यंत अवघड अशी निवड आहे. विकासासाठी आणि नागरिकांसाठी प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांनी इथून पुढं सत्ता हातात घ्यावी." अपेक्षांवर खरं उतरावं, अशी इच्छा सोनालीनं यावेळी उमेदवाराकडून केली आहे.
अक्षय कुमार दिला नागरिकांना सल्ला : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अभिनेता अक्षय कुमारनं सकाळी येऊन मतदान केंद्रावर येऊन आपला हक्क बजावला आहे. यावेळी त्यानं नागरिकांना वोट करण्यासाठी जागृत केलं. आतापर्यत अक्षयनं भारतात दुसऱ्यांदा मतदान केलंय. यापूर्वी त्याचं कॅनेडियन नागरिकत्व होतं, त्यामुळे त्याला भारतामध्ये मतदान करण्याचा अधिकार नव्हता. कॅनेडियन नागरिकत्वाचा त्याग केल्यानंतर, त्यानं भारतीय नागरिकत्न स्वीकारलं. याशिवाय अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरनं नागरिकांना आवाहन करत म्हटलं की, "आपली ही सामाजिक जबाबदारी आहे, प्रत्येक व्यक्तीनं मतदान करायला हवं. आपलं, राज्याचं आणि आपल्या देशाचं भविष्य घडवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे. जर, तुम्ही मतदान केलं नसेल, तर तुम्ही तक्रार करु शकत नाही.' आता अनेकजण मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजवताना दिसत आहेत.