मुंबई Jeevan Gaurav Puraskar 2024 : बुधवारी वरळीतील डोम इथं महाराष्ट्र शासनाचा मराठी चित्रपट गौरव पुरस्कार सोहळा रंगला. यात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते शिवाजी साटम या दोन ज्येष्ठ कलावंतांसह अन्य नामवंत कलाकारांना देखील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी "राज्याचा हॅपीनेस इंडेक्स नेहमीच उंचीवर ठेवण्याची जबाबदारी ही इथल्या कलाकारांची आहे," असं वक्तव्य करत कलावंतांकडे जणू एक दायित्व सोपवलं. सोबतच त्यांनी उद्योगपती अनंत अंबानी यांच्या शाही विवाह सोहळ्यातील एक किस्सा सांगितला. पैशापेक्षा कला किती महत्त्वाची आहे, याचं उदाहरण देखील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं.
ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, आशा पारेख यांना 'जीवनगौरव' : राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या दिवंगत राज कपूर जीवन गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना गौरवण्यात आलं. त्यांना 2023 चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना प्रदान करण्यात आला. जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यानंतर शिवाजी साटम काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला.
ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम झाले भावुक : यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम म्हणाले की, "सुरुवातीला जेव्हा मला मंत्रालयातून फोन आला की तुम्हाला 'जीवनगौरव' पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे, त्यावेळी माझ्या मनात प्रश्न आला की मलाच का ? पण त्याचवेळी मला माझी सुरुवात आठवली. माझी सुरुवात ही मुंबईत गणेश मंडळाची नाटकं पाहण्यात आणि नाटक सादर करण्यात झाली, मला ते दिवस आठवले. त्यानंतर मी विविध व्यावसायिक नाटकं केली. अगदी मी जेव्हा पहिला कॅमेरा फेस केला, तो देखील आपल्या दूरदर्शनचा. त्याआधी मी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता. त्यामुळे मला मिळालेला हा पुरस्कार मी ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, त्या सर्व रसिकांना समर्पित करतो."
अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार : या पुरस्कारांसोबतच इथं अन्य पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले. यामध्ये 2024 च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानं ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गौरवण्यात आलं. 2024 चा चित्रपटांसाठीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक विभागाच्या वतीनं कंठ संगीतातील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारानं ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांना गौरवण्यात आलं. दिवंगत राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक एन चंद्रा यांना गौरवण्यात आलं. तर, चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान या पुरस्कारानं लेखक, अभिनेता, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना गौरवण्यात आलं.
पुरस्काराची रक्कम दुप्पट : या पुरस्कार सोहळ्यात आपलं मनोगत व्यक्त करताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "इथल्या सर्व कलाकारांचं पुरस्कार देऊन अभिनंदन करताना सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून मला आनंद होत आहे. मागील वर्षी आम्ही या पुरस्काराची रक्कम देखील दुप्पट केली असली तरी, तुमच्या कर्तृत्वाच्या गौरवासमोर ती निश्चितच कमी आहे. पुरस्काराची रक्कम किती आहे, यावर त्याचं आकलन, मूल्यांकन करता कामा नये. कारण, हा पुरस्कार शासनाच्या वतीनं दिला जातोय. शासन हे या राज्यातील साडेतेरा कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं. त्या साडेतेरा कोटी जनतेच्या वतीनं शुभेच्छा असतात."
'सैराट' चित्रपटातील 'झिंगाट' गाण्यावर नाचतो 81 वर्षाचा वृद्ध : पुढं बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "महाराष्ट्राची चित्रपटसृष्टी इतरांनी हेवा करावी, अशी आहे. 'सैराट' चित्रपटातील जेव्हा 'झिंगाट' गाणं वाजतं, तेव्हा 81 वर्षांचा वृद्ध देखील नाचायला लागतो. तेव्हा आपल्या शब्दांचं आणि संगीताचं मोल कळतं. मागं आपल्या देशात एका शाही विवाह सोहळ्याची खूप चर्चा झाली. त्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण मलादेखील आलं होतं. त्या गर्दीत मीदेखील होतो. मात्र, तिथं गेल्यावर मला एक गोष्ट नक्की कळली. ती म्हणजे शक्ती धनाची असेल, तर सुंदरता मात्र गुणाची असते. कारण, देशात सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणाऱ्या माणसासोबत फोटो काढण्यापेक्षा तिथं जे कलाकार आले होते, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी जास्त होती. जग जिंकणं कठीण पण मन जिंकणं महाकठीण आहे."
महाराष्ट्राचा 'हॅपीनेस इंडेक्स' उंच ठेवण्याची जबाबदारी कलाकारांवर : "एक काळ होता जेव्हा, एखादा देश किती संपन्न आहे, हे त्या देशाच्या आर्थिक संपन्नतेवरून आणि इतर बाबींवरून ठरवलं जायचं. आज हॅपीनेस इंडेक्सवरुन एखाद्या देशाची संपन्नता ठरवली जाते. महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स नेहमीच उंच ठेवण्याची जबाबदारी सांस्कृतिक विभागासोबतच तुमच्यावर देखील आहे. मागील काही वर्षांपर्यंत महाराष्ट्रात कुठं चित्रपटाचं चित्रीकरण करायचं असेल, तर त्यासाठी शुल्क आकारण्यात यायचं. ते आता शून्य करण्यात आलं आहे." अशीही माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
राज्यात उभारणार चित्र नाट्यगृह : पुढे येत्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकार नेमके काय प्रयत्न करत आहे, यावर देखील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं. याबाबत माहिती देताना त्यांनी सरकारी ओटीटी तयार करता येऊ शकते का? यावर देखील समिती तयार करण्यात आल्याचं स्पष्ट केलं. येत्या काही काळात 75 नाट्यगृहं उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या चित्र नाट्यगृहांचं डिझाईन तयार असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष निधी दिल्याचं देखील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. या चित्र नाट्यगृहांमध्ये सकाळी चित्रपट आणि रात्री नाटकांचे प्रयोग होणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- शिवाजी साटम यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; राज्य शासनाकडून चित्रपट क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा - v shantaram jeevan gaurav puraskar
- ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर - singer Anuradha Paudwal
- मेलबर्न फिल्म फेस्टिव्हल सुरू होण्यापूर्वी करण जोहर आणि राणी मुखर्जीनं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट - Karan Johar and Rani Mukerji