Shivrayancha Chhava Trailer : दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 'शिवरायांचा छावा' या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य आणि संघर्षाने भरलेला जीवनप्रवास या चित्रपटाच्या रुपाने जिवंत करण्यात आलाय. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून सिंहासनावर बसून कुशलतेने राज्यकारभार सांभाळण्याचं भाग्य त्यांच्या वाट्याला नव्हतं. स्वराज्याच्या या कर्तबगार छत्रपतीला कायम काटेरी शिरपेच बाळगावा लागला. त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरून दाखलेल्या अद्वितीय शौर्याची गाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर युद्ध प्रसंग, अंगावर रोमांच उभे करणारे संवाद आणि शंभूराजांच्या साहसी मोहिमांनी खिळवून ठेवणारा आहे.
'शिवरायांचा छावा' चा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमधून मिळत असलेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. प्रेक्षकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केल्याचं दिसतं. "छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आणि महाराजांनी पाहिलेले स्वप्न अहत तंजावर, तहत पेशावर, व्हावे ....एक दम सुपरहिट ट्रेलर होता खूप छान वाटलं. संभाजी महाराजांची भूमिका दमदार छान वाटली. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पण तितकाच रोचक व शोभनीय दाखवला असेल अशी आशा करतो.", असे एकानं लिहिलंय. "शत्रुवरचं ध्यान आणि शस्त्रावरचं भान कधीही सुटता काम नये. प्रत्येक डायलॉग जबरदस्त," अशी एक प्रतिक्रिया संवादाबद्दल मिळाली आहे. "कालपासून खूप उत्सुकता लागली होती ट्रेलरची अखेर ट्रेलर आलाच... स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा महान इतिहास जगासमोर येणार.", असे म्हणत दिगपाल लांजेकर आणि त्यांच्या टीमला प्रेक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित आठ चित्रपट बनवण्याचा निर्धार केला आहे. खरंतर हे मोठे शिवधनुष्य ते कसे पेलणार याबद्दल साशंकता होती. मात्र पहिल्याच 'फर्जंद' चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यामुळे 'शिवराज अष्टक' मोहिमेचं दिग्पाल यांचं स्वप्न पूर्ण होताना प्रत्यक्ष दिसलं. 'शेर शिवराज' आणि 'सुभेदार' या पाच यशस्वी चित्रपटानंतर त्यांनी आता 'शिवराज अष्टक' चित्रपट मालिके व्यतरिक्त ऐतिहासिक चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. छत्रपती संभीजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित 'शिवरायांचा छावा' हा चित्रपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. 'शिवरायांचा छावा' या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची शीर्षक भूमिका भूषण पाटील साकारत आहे. 'स्वराज्यमाता' जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर आणि औरंगजेबच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी दिसत आहेत. या चित्रपटात तृप्ती मधुकर तोरडमल, प्रसन्न केतकर,अभिजीत श्वेतचंद्र, विक्रम गायकवाड, भूषण शिवतारे, अमित देशमुख, अवधूत गांधी,रवी काळे,राहुल देव, ज्ञानेश वाडेकर, ईशा केसकर, नंदिनी कान्हेरे, दिप्ती लेले, सौरभ कुशवाह,बिपिन सुर्वे,आशुतोष वाडेकर,दादा पासलकर, सागर संत,शरद सिंह,राम आवणा, रणजित रणदिवे, नीता टिपणीस दोंदे,अमित मेहता, सायली सांभारे अशी कलाकारांची मोठी फौज या ऐतिहासिक चित्रपटाला साकारत आहे.
हेही वाचा -