मुंबई - Marathi Film 1234 : निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी अभिनीत वरुण नार्वेकरच्या आगामी '१२३४' या चित्रपटाने सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घातला आहे. या 'एक दोन तीन चार' या सिनेमाचं वैशिष्टय म्हणजे 'मुरांबा' या गाजलेल्या चित्रपटानंतर वरूण नार्वेकर या दिग्दर्शकाचा हा पुढील सिनेमा आहे. या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिली आहे. तसेच या सिनेमाच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे. त्याची जोडी जमली आहे वैदेही परशुरामी या सुस्वरूप आणि टॅलेंटेड अभिनेत्रीबरोबर. यानिमित्ताने वैदेही आणि निपुण ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर, यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय, ‘फोकस इंडियन‘ नावानं सोशल मीडियावर लोकप्रिय झालेला इन्फ्लुएंसर करण सोनावणेही यात दिसेल.
या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी एक अनपेक्षित आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकताच "एक दोन तीन चार" या चित्रपटाचा आकर्षक टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये सम्या आणि सायलीच्या भूमिकांमध्ये निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी साकारत आहेत. या गोड प्रेमकथेत एक अनोखा ट्विस्ट दाखवला गेला आहे ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनपेक्षितपणे मोठा बदल घडतो. हा बदल त्यांच्यासाठी हॅपिनेसचा ट्विस्ट असून तो त्यांच्या जीवनात काय आणि कसा परिणाम करतो हे चित्रपटातून नर्मविनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणाले होते की, "नवविवाहित समीर (निपुण) आणि सायला (वैदेही) यांना आयुष्यातून एक मोठं सरप्राईज मिळतं. त्यामुळे सुरुवातीला दोघेही खूप आनंदी होतात. पण नंतर हळूहळू त्याला त्याचं टेन्शन जाणवू लागतं. आता चित्रपटाच्या प्रमोशनमधून हे सरप्राईज काय आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल."
'एक दोन तीन चार' हा सिनेमा येत्या १९ जुलैला प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा -