मुंबई : दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर त्यांचा जीवनपट "धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे" या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर "धर्मवीर 2" हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सप्टेंबरमध्ये सिनेमा रिलीज होणार धर्मवीर 2
"सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जर हा ऑगस्टमध्ये चित्रपट रिलीज केला तर हा चित्रपट पाहायला कोण येईल? दिवंगत आनंद दिघे यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास राज्यातील सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांना समजला पाहिजे. सध्या राज्यात पूर परिस्थिती आहे. अशावेळी 9 ऑगस्ट रोजी जर सिनेमा प्रदर्शित केला तर तो पाहण्यास लोकांचा कमी प्रतिसाद मिळेल, म्हणून याची आम्ही रिलीज डेट सप्टेंबरमध्ये ठेवली आहे. हा सिनेमा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होईल. परंतु अजून याची तारीख निश्चित नाही", असं या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.
दिग्गजांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित
दरम्यान, "धर्मवीर 2" या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित सोहळा काही दिवसांपूर्वी दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला होता. यावेळी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात "धर्मवीर 2" हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र आता या सिनेमाची 9 ऑगस्टला प्रदर्शित होणारी तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सिनेमाच्या निर्मात्यांनी दिली आहे.