वॉशिंग्टन - जगाची पहिली मिस वर्ल्ड किकी हकनसेन हिचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं आहे. 1951 मध्ये लंडन येथे झालेल्या पहिल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत तिला विजेतेपदाचा मुकुट प्रदान करण्यात आला होता. याच वर्षी तिनं मिस स्वीडन स्पर्धाही जिंकली होती. सोमवारी, 4 नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियातील घरी झोपेतच तिचं निधन झालं. अत्यंत शांत अवस्थेत तिचं निधन झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मिस वर्ल्ड इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या मृत्यूची अधिकृत माहितीही देण्यात आली आहे.
बिकिनी घालून मुकुट परिधान करणारी पहिली आणि शेवटची मिस वर्ल्ड - स्वीडनमध्ये जन्मलेल्या किकी हॅकनसनने 1951 मध्ये लंडनमध्ये झालेल्या पहिल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस वर्ल्डचा ताज जिंकून इतिहास रचला होता. जेव्हा तिला मुकुट घालण्यात आला तेव्हा तिनं बिकिनी घातली होती, त्यानंतर पोपने तिच्यावर टीका केली होती आणि काही देशांनी हा मुकुट परत घेण्याची धमकीही दिली होती. यामुळे 1952 मध्ये मिस वर्ल्ड या स्पर्धेत बिकिनीवर बंदी घालण्यात आली होती आणि त्याच्या जागी स्विमवेअरचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत नंतर बिकिनींचा समावेश करण्यात आला असला, तरी मुकुट (क्राऊन सेरेमनी) परिधान करताना बिकिनी घालणारी हाकन्सन ही पहिली आणि शेवटची विजेता ठरली होती.
29 जुलै 1951 रोजी लिसियम बॉलरूममध्ये आयोजित मिस वर्ल्ड या स्पर्धेची सुरुवात ब्रिटनचा उत्सव म्हणून झाली. या कार्यक्रमाकडे एक सामान्य स्पर्धा म्हणून पाहिले गेले, परंतु नंतर ही स्पर्धा जागतिक वारसा बनली आणि किकीच्या विजयाने मिस वर्ल्ड स्पर्धेची सुरुवात झाली हे तिचं मोठं योगदान मानलं जातं. सोशल मीडियावर शेअर केलेल्या श्रद्धांजलीमध्ये, मिस वर्ल्ड पेजेंटच्या अधिकृत पेजनं तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तिचा मुलगा अँडरसननेही आईला श्रद्धांजली वाहिली. किकी हॅकनसनच्या निधनाने मिस वर्ल्ड स्पर्धेच्या एका युगाचा अंत झाला. पहिली मिस वर्ल्ड म्हणून तिने या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे.