मुंबई - Sudha Kongara apologize : 'सोरराई पोत्रू' या तमिळ भाषेतील चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा एका नव्या वादामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी अलीकडे दिलेल्या मुलाखतीत स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या नावे एक गोष्ट सांगितली होती. ही गोष्ट खरंतर सावरकरांची नसून महात्मा ज्यातिबा फुले यांची होती. मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, इंटरनेटवर सुधा कोंगाराविरोधात अनेक कमेंट्स ट्रेंड झाल्या. त्यानंतर, सुधा कोंगारा यांनी त्यांच्या एक्स साइट पेजवर हे स्पष्ट केलं की, आपल्या हातून चूक झाली आहे. त्यांनी आपला पश्चाताप व्यक्त केला आणि माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीत काय म्हणाल्या होत्या सुधा कोंगरा?
दिग्दर्शिका सुधा कोंगारा यांच्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, मी मूळात इतिहासाची विद्यार्थिनी आहे. मी जेव्हा स्त्री अभ्यास शिकत होते तेव्हा माझ्या एका शिक्षिकेनं मला सावरकरांची गोष्ट सांगितली. सावरकर हे महान नेते होते. सर्वांचा आदर करत होते. लग्न झाल्यानंतर त्यांनी पत्नीला शिक्षणासाठी भाग पाडलं. त्याकाळी मुली शिक्षण न घेता केवळ घरकाम करत असत. ते पत्नीसह शिकण्यासाठी जात असताना त्या गल्लीतील लोक त्यांची चेष्टा करायचे. परंतु ते हात धरुन पत्नीला शिकण्यासाठी घेऊन जात असत.
सुधा कोंगारा मुलाखतीत ज्या गोष्टी सांगत होत्या त्या सावरकरांच्या बाबतीतल्या नव्हत्या. खरंतर ज्योतिबा फुले यांनी पत्नी सावित्रीबाईंना शिकवलं आणि पुढे मुलींसाठी शाळा काढली हा इतिहास आहे. याचा विपर्यास करुन वेगळीच कथा सावरकरांच्या नावे सुधा कोंगुरा सारख्या व्यक्तीनं जाहीरपणे सांगावी याचं आश्चर्य अनेक अभ्यासकांना वाटलं. त्यांनी कोंगारा यांच्यावर टीका केल्यामुळे तातडीनं त्यांनी सोशल मीडियावर माफी मागितली आहे.
என் தவறுக்கு வருந்துகிறேன். எனது பதினேழாவது வயதில் பெண் கல்வி குறித்த எனது வகுப்பு ஒன்றில் எனது ஆசிரியர் சொன்னதை வைத்து நான் அந்த நேர்முகத்தில் பேசியிருந்தேன். ஒரு வரலாற்று மாணவியாக அதன் உண்மைத் தன்மையை நான் சோதித்திருக்க வேண்டும். அது என் பக்கத்தில் தவறுதான். எதிர்காலத்தில்…
— Sudha Kongara (@Sudha_Kongara) July 27, 2024
त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट लिहून माफी मागताना लिहिलंय, "माझ्या अज्ञानासाठी मी माफी मागते. सतराव्या वर्षी जेव्हा मला महिलांच्या अभ्यासाच्या जगात नेलं गेलं आणि मी माझ्या शिक्षकाकडून हा किस्सा ऐकला होता, तेव्हा मी तथ्य तपासलं नाही. मी ते केलं पाहिजे होतं. इतिहासाची विद्यार्थिनी आणि कठोर संशोधक या नात्यानं मी अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा होता. अशाप्रकारे, माझ्या मुलाखतीचा जन्म निव्वळ अज्ञानातून झाला आहे आणि कधीही कोणाच्याही कामगिरीचं श्रेय इतरत्र वाटप करण्याच्या हेतूनं नाही. मी माझं तथ्य तपासल्याशिवाय यापुढे मुलाखती देणार नाही असं मी वचन देते. ज्यांनी मला दुरुस्त केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सदैव आदर."
कोण आहेत सुधा कोंगरा?
'द्रोगी' चित्रपटाद्वारे तमिळमध्ये दिग्दर्शिका म्हणून पदार्पण करणाऱ्या सुधा कोंगारा यांनी 'इरुदी सूत्रू' हा चित्रपट तमिळ आणि हिंदी भाषेत बनवला. हिंदीमध्ये 'खडूस साला' या नावानं चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी बनवलेल्या 'सोरुराई पोत्रू' या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सुर्या याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटानं 68 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 5 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले. याच चित्रपटाचा रिमेक यावर्षी 'सरफिरा' या शीर्षकासह सुधा कोंगरा यांनी दिग्दर्शित केला. अक्षय कुमारनं मुख्य भूमिका साकारलेल्या या चित्रपटाची आज बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी चर्चा आहे.