मुंबई - 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आले आहे. रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्मानं तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता याप्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या या वादात रुपाली गांगुली मौन बाळगून होती, मात्र आता तिचा संयम सुटला असून तिनं मोठी कारवाई केली आहे. रुपालीनं आपल्या सावत्र मुलीला धडा शिकविण्याचा मार्गाचा अवलंबला आहे. 11 नोव्हेंबर रोजी तिनं आपल्या सावत्र मुलीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. यात तिनं 50 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
रुपालीनं केला मानहानीचा दावा दाखल : या कारवाईनंतर तिची सावत्र मुलगी घाबरलेली दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात ईशा वर्मा आता आपल्या दाव्यापासून मागे हटताना दिसत आहे. सावत्र मुलीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यासाठी रुपालीनं सेलिब्रिटी वकील आणि 'बिग बॉस 17'ची स्पर्धक सना रईस खानची मदत घेतली आहे. सनानं एका मुलाखतीत सांगितलं की, "रुपाली गांगुली हे पाऊल उचलले कारण ईशा वर्मानं तिच्या 11 वर्षाच्या मुलाला त्यात ओढले होते." याशिवाय सनाच्या टीमनं प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'आम्ही रुपालीच्या सावत्र मुलीला तिच्या खोट्या आणि हानिकारक विधानांना प्रतिसाद म्हणून मानहानीची नोटीस बजावली आहे. कारण रूपालीवरचे हे बिनबुडाचे आरोप आहेत. यामुळे तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे आणि तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेणे हे यातून स्पष्टपणे होत आहे. अशा कृत्यामुळे फक्त भावनिक त्रासच झाला नाही, तर तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक नुकसान देखील होते, हा एक कलंक आहे.'
ईशा वर्मा उचलले हे पाऊल : मानहानीच्या प्रकरणानंतर, ईशानं प्रथम आपल्या सावत्र भावाला या प्रकरणात ओढल्याबद्दल माफी मागितली. रुपालीच्या मुलाला तिनं यापूर्वी म्हटलं होतं, "त्याला त्याच्या आई-वडिलांचे प्रेम मिळत आहे, जे त्याला आणि त्याच्या बहिणीकडून मिळाले नाही. रुपाली गांगुलीचा मुलगा प्री-मॅच्युअर नसून अनौरस आहे.' यानंतर हे संपूर्ण प्रकरण तापले, ईशानं तिचे इंस्टाग्राम अकाउंट खाजगी केले. यापुढे तिला फॉलो न करणारे लोक तिचे अकाउंट पाहू शकत नाहीत. ईशा आता आपल्या दाव्यांपासून मागे हटत असल्याचं लोक आता म्हणू लागले आहेत.